पुणे

Lalit Patil case : ललित पाटील प्रकरणाचा तपास एसीपीकडे !

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणाची दिवसेंदिवस वाढत जाणारी व्याप्ती, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गांभीर्य पाहता हा तपास आता अमलीपदार्थ विरोधी पथकाकडून काढून गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांकडे (एसीपी) देण्यात आला आहे. ससून रुग्णालयातून ललितने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. त्या प्रकरणाचा तपासदेखील स्थानिक पोलिसांकडून काढून गुन्हे शाखा युनिट दोनकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ससून रुग्णालयातून ललित आणि त्याचे बाहेरचे साथीदार चालवत असलेल्या ड्रग रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश करत दोन कोटी 14 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात ललित आणि त्याच्या साथीदारांवर अमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास आतापर्यंत अमलीपदार्थ विरोधी पथकच करत होते. मात्र, आता याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.

तर ललित याने ससून रुग्णालयातून एक्सरेसाठी जात असताना, पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला होता. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सुरुवातीला बंडगार्डन पोलिस करत होते. मात्र, त्याचा तपास आता गुन्हे शाखा युनिट दोनकडे देण्यात आला आहे. दोन्ही अधिकार्‍यांनी पूर्वीच्या तपासाची माहिती घेतली आहे.

दरम्यान, आतापर्यंत या दोन्ही गुन्ह्यांत पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य सूत्रधार ललित अद्याप फरार आहे. भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. तर ड्रायव्हर दत्ता डोके याला हडपसर परिसरातून पकडले. ललितने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर त्याला रावेतपर्यंत त्यानेच गाडीतून सोडले.

ललित आणि भूषण यांना अभय दिल्याचा तसेच ससूनमध्ये ललितला दाखल करून आलिशान सेवा देण्यास भाग पाडल्याचा आरोप करत काही राजकीय पुढार्‍यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले. एवढेच नाही, तर काही जणांची नार्को चाचणी करण्याची मागणीही करण्यात आली. दिवसेंदिवस या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने आणि त्याचे गांभीर्य पाहता आता हा तपास सहायक पोलिस आयुक्तांकडे देण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT