पुणे : एकतेची मशाल पेटवू या, द्वेषाचा अंधार दूर करू या. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व जिजाऊ, शिवरायांचे मावळे आहोत. असा संदेश देत लाल महालात दीपावलीच्या निमित्ताने दिपोत्सव साजरा करण्यात आला.
आखिल भारतीय शिवमहोस्तव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन, आखिल शिवाजीनगर शिवमहोस्तव समिती आणि शिवप्रेमींच्या वतीने आयोजित दीपोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. गेल्या दहा वर्षांपासून ज्योती कदम, बाळासाहेब कदम तसेच शीतल संदीप भावसार व कु. श्रुती संदीप भावसार या लाल महालात सुंदर रांगोळी काढून लाल महाल सजवतात. त्यांचा सन्मान करण्यात आला. विकास पासलकर यांच्या माध्यमातून सामाजिक सद्भावनेतून स्मृतीशेष तानाजी मिंधे या जुन्नर तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला भावाच्या नात्याने साडी चोळी मुलांना कपडे आणि शिष्यवृत्ती देण्यात आली. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला शिष्यवृत्ती देणारे संजय गरुड यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे मारुतीराव सातपुते, विराज तावरे, पुरुषोत्तम जाधव, निलेश इंगवले, मंदार बहिरट उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास वडघुले व विराज तावरे यांनी केले. प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य काळे अक्षय बोरकर राजेश कदम निखिल भसमारे आदींनी सहकार्य केले.