lakshmishwar mahadev mandir Pudhari
पुणे

Pune News: 200 वर्षांपूर्वीच्या वारसावैभवाचे साक्षीदार रास्ता पेठेतील मंदिर

1786 मध्ये रास्तेवाड्यात राहणारे रास्ते वंशजाचे सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी हे शिव मंदिर बांधले

पुढारी वृत्तसेवा

कसबा पेठ : रास्ता पेठेतील प्रसिद्ध रास्ते वाड्याच्या परिसरामध्ये पेशवेकालीन श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारात प्रवेश करताच 200 वर्षांपूर्वीच्या वारसावैभवाची साक्ष पटते. इ. स. 1786 मध्ये रास्तेवाड्यात राहणारे रास्ते वंशजाचे सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी हे शिव मंदिर बांधले. या मंदिरासमोरच तीन भव्य कुंडही बांधले होते. या कुंडामध्ये दगडी पाइपलाइनद्वारे पाणी आणले गेले होते. पुढे हे तिन्ही कुंड बि—टिश सरकारच्या कालखंडामध्ये बि—टिश सरकारने नष्ट केले. आज त्याच्या काही खुणाही आढळून येतात. मंदिराचे प्रवेशद्वार देखणे असून, महिरपीसारखी नक्षी व दगडी कोनाडे आहेत, ज्यात दिवे लावल्यानंतर मंदिर परिसर अतिशय विलोभनीय होतो. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून, मराठाकालीन स्थापत्याची झलक यातून दिसून येते.

येथील खांबांवर शनिदेवता, गणपती, चंडिकादेवी तसेच दत्तत्रयांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन फूट खोल बांधकामाची दगडी भिंत आहे. पायाजवळ अडीच फूट उंचीच्या खांबाची चौकोनी बैठक आहे. मंदिराच्या ईशान्येला छोट्या दगडात ब—ह्म आणि नागदेवता कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरामागे हनुमान आणि दत्तात्रय मंदिर नंतर उभारल्याचे दिसून येते, अशी माहिती सरदार रास्ते यांचे वंशज कुमार रास्ते यांनी दिली.

लक्ष्मीश्वर शिव मंदिराची वैशिष्ट्ये

श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरामध्ये येण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. या मंदिरात उत्तरमुखी असलेले अडीच फुटांचे शिवलिंग आहे. पूर्वेला दार असलेला गाभार्‍याला लागून आयताकृती असलेले अनेक खांबांचे सभामंडप आहे. ज्यावर तीन कमानी आहेत.

गाभार्‍यांच्या मध्यभागी कमळशिल्प आहे. भिंतीवर घोड्याच्या आकारातील शिल्पे आहेत. सभामंडपाचे छत हे घुमटासारखे असून, सभामंडपाबाहेरील नंदी हा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. खांबांवर कोरीव काम केलेले आहे.

लक्ष्मीश्वर मंदिराची कलशपुनर्स्थापना

मंदिराच्या कळसाच्या डागडुजीचे काम नुकतेच करण्यात आलेले असून, 21 जुलै 25 रोजी कलशपुनर्स्थापना करण्यात आली. सरदार कुमारराजे रास्ते आणि सरदार माधवराजे रास्ते यांच्या हस्ते लघुरुद्र व याग करण्यात आले. मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री, दीपोत्सव हे कार्यक्रम होत असतात. सध्या या मंदिरात अमोद भगवान कुटुंबीय यांची चौथी पिढी मंदिराचे पुजारी म्हणून कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT