पुणे

कस्टम, ड्रग्ज फंडा घालतोय लाखोंचा गंडा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  हॅलो…मी कस्टम विभागातून बोलतोय…तुमच्या नावाने आमच्याकडे विदेशातून एक पार्सल आलंय..किंवा तुम्ही पाठवलेले पार्सल अडकले असून, त्यामध्ये ड्रग्ज आणि विदेशी चलन आहे. तुमच्याकडे आम्हाला चौकशी करावी लागते. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती आम्हाला द्या.. विश्वास नसेल, तर आमच्या एसीपी साहेबांशी बोला.. असे जर तुम्हाला कोणी फोन करून विचारत असेल तर वेळीच सावध व्हा.. कारण हा सायबर चोरट्यांनी तुमच्यासाठी लावलेला सापळा आहे. मागील काही दिवसांपासून सायबर चोरट्यांनी नागरिकांना गंडा घालण्यासाठी कस्टम, ड्रग्ज् आणि पोलिसांचा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना भीती दाखवत सायबर चोरटे अक्षरशः लाखोंचा गंडा घालत आहेत. नागरिकदेखील कोणत्याही प्रकारची खात्री न करता आपले बँक खाते त्यांच्या हवाली करत आहेत.

आता हे पाहा…
तुम्ही पाठवलेले पार्सल कस्टम डिपार्टमेंटमध्ये अडकले आहे. त्यामध्ये ड्रग्स असल्याने ते पुढे जाऊ शकत नाही, अशी भीती दाखवून एका महिलेला 20 लाख 81 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि.28) कर्वेनगर परिसरात राहणार्‍या एका 59 वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन कुरियर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये 500 ग्राम ड्रग्स आहेत म्हणून तुमचे पार्सल मुंबई येथील कस्टम डिपार्टमेंटमध्ये अडकले आहे असे सांगितले. भारताबाहेर ड्रग्स पाठवण्यासाठी महिलेच्या आधार कार्डचा वापर होत असल्याने एनसीबीकडे तक्रार दाखल झाली आहे अशी भीती दाखवली. मात्र, फिर्यादींनी त्याला नकार दिला. त्या वेळी सायबर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात खेचण्यासाठी स्काईप एप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या मोबाईलचा संपूर्ण अ‍ॅक्सेस मिळवून खासगी माहितीचा वापर करत महिलेच्या बँक खात्यातून 20 लाख 81 हजार 634 रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

…हे लक्षात ठेवा
हा सायबर चोरट्यांनी तुम्हाला आर्थिक गंडा घालण्यासाठी लावलेला ट्रॅप आहे.
अनोळखी कॉलला आपली वैयक्तिक माहिती देणे टाळा
आलेल्या कॉलची खात्री करा
बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नका

असे ऑनलाइन फोन करून कोणतीही यंत्रणा तुम्हाला अ‍ॅप डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यातील पैसे ट्रान्स्फर करून घेत नाही.
फसवणूक होताच सायबर पोलिसांशी संपर्क करा
सायबर चोरट्यांच्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका
ड्रग्ज् आणि पोलिसांच्या नावे कोणी धमकावत असेल, तर पोलिसांशी संपर्क करा.

SCROLL FOR NEXT