पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाप्रीतकडून नवे पथदिवे उपलब्ध झालेले नसतानाही विद्युत विभागाने चालू स्थितीतील पथदिवे बदलण्याची उठाठेव सुरू केल्याने महापालिकेला साडेदहा लाखांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. शहरात एकूण 1 लाख 80 हजार पथदिवे आहेत. त्यातील 90 हजार पथदिव्यांवर टाटा कंपनीचे फिटिंग (दिवे) आहेत. आणखी पाच वर्षे या कंपनीकडे हे दिवे आहेत, तर उर्वरित 90 हजार पथदिव्यांची देखभाल महापालिका करते.
महापालिकेच्या वास्तू, मैलापाणी प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, पथदिवे यासह इतर ठिकाणी वर्षभरात 29.10 कोटी वीज युनिट विजेच्या वापरासाठी 153 कोटी रुपये वीजबिल भरावे लागत आहे. या बिलाची बचत करण्यासाठी महापालिकेने 'महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) सोबत करार केला आहे. या करारानुसार बचत झालेली 80 टक्के रक्कम 'महाप्रीत'ला तर 20 टक्के रक्कम महापालिकेला मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि सहकानगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी 10 हजार पथदिवे 'महाप्रीत'कडे दिले जाणार आहेत. या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दिवे लावण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. पण, विद्युत विभागाने टाटा कंपनीचे दिवे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. तेथे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जुने दिवे आणून बसविले जात आहेत. एक दिवा काढून तो बसविण्यासाठी ठेकेदाराला 300 रुपये द्यावे लागणार आहेत.
पण, पुन्हा एक महिन्याने हे दिवे काढून टाकावे लागणार आहेत. म्हणजे एकच काम दोनवेळा करावे लागणार आहे. पण, यासाठीचा ठेकेदाराला साडेदहा लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे विद्युत विभागातील कर्मचार्यांनी सांगितले. धायरी येथील टाटा कंपनीचे दिवे काढल्यानंतर तेथे दुसरे दिवे लावले. मात्र, हे दिवे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याने या ठिकाणी पुन्हा सुरू असलेले दिवे लावले.
महाप्रीतचे दिवे येण्यास आणखी काही दिवसच लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बिबवेवाडी येथील 3500 दिवे सहकारनगर, सिंहगड रस्ता भागात लावले जाणार आहेत. यासाठी ठेकेदाराला प्रतिफिटिंग 300 रुपये दिले जाणार आहेत. हे सर्व दिवे सुरू असल्याने महापालिकेचे नुकसान नाही.
श्रीनिवास कंदूल,
मुख्य अभियंता, विद्युत विभाग