पुणे : लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते देय होते. त्यापैकी एका हप्त्याची रक्कम डिसेंबरमध्ये देण्यात आली. आता उर्वरित दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये येत्या मकर संक्रांतीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.
बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3 हजार जमा होणार. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. डीबीटीअंतर्गत ही रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होते.
सध्या या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया होती. त्यामुळे दिवाळीनंतर या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात आले नव्हते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे आले नव्हते. पण, 31 डिसेंबर 2025 आणि 1 व 2 जानेवारी 2026 या काळात काही महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाले. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन हप्त्यांची प्रतीक्षा आहे. पण, मंत्री महाजन यांच्या पोस्टनुसार आता हे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये 14 जानेवारीपूर्वी मिळणार आहेत.