वाकड : पुढारी वृत्तसेवा : वाकड परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असून आपण स्मार्ट पिंपरी-चिंचवडची स्वप्ने बघत असताना पिंपरी-चिंचवडचे हार्ट म्हणून प्रसिद्ध असलेले वाकड येथे मात्र सार्वजनिक स्वच्छतागृह शोधून सापडत नाहीत.
आयटी नगरी हिंजवडीच्या जवळ वाकडमध्ये राहण्यासाठी लोकांची पहिली पसंती वाकडला आहे, त्यामुळे या परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. परंतु या परिसरात राहणारे नोकरवर्ग पुरुषांसाठी किंवा महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृहे नाहीत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुद्धा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे असावीत असा नियम असून या नियमाला वाकड परिसरात हरताळ फासला की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व स्वच्छतागृहे गुगल मॅपवर शोधून सापडतात. परंतु यामध्ये वाकडसाठी वेगळा न्याय आहे की काय, अशी शंका मनात निर्माण होते. महापालिकेतर्फे नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात तरीही लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सार्वजनिक शौचालयाअभावी रात्रीच्या वेळेस एखादी विपरीत घटना घडणेआधी महापालिकेने या कडे लक्ष द्यावे, अशी विनंती परिसरातील महिला, नागरिकांनी केली आहे. तसेच मुंबई पुणे हायवेवर शनी मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असून स्वच्छतागृहांअभावी लोक उघड्या जागेचा वापर करत आहेत. त्यामुळे स्टॉपवर थांबलेल्या महिलांना मान खाली घालून उभे राहावे लागत आहे.
स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट सिमेंटचे रस्ते तयार होत आहेत. तर महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था का होत नाही, सध्या परिस्थितीत महापालिकेवरती प्रशासक असून प्रशासनाने तरी हा विषय लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महिलांची कुचंबणा
बहुतांश ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे नोकरीस असलेल्या महिलांसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे महिला वरदानसाठी स्वतंत्र शौचालय व्हावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.
शासकीय नियमांची पायमल्ली
वाकड परिसरात सोसायट्यांची संख्या जास्त असून कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिलांची मात्र या परिसरात स्वच्छतागृहां अभावीयामुळे फार मोठी समस्या निर्माण होते. साधारण शासकीय नियमानुसार एक किलोमीटर अंतरावर सार्वजनिक शौचालय असावे किंवा दाट लोकवस्तीच्या जागी स्वच्छतागृहे असावे परंतु हे नियम वाकडसाठी अपवाद आहेत की काय अशी शंका मनात निर्माण होते.