पुणे

शेळगाव : धोकादायक पुलावरून पडून मजुराचा मृत्यू

अमृता चौगुले

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शेळगाव तेलओढा येथील निरा डावा कालव्यावरील अनेक वर्षांपासून धोकादायक झालेल्या पुलावरून कालव्यात पडून बबन भीमा चांदणे (वय 50) या मजुराचा मंगळवारी (दि. 20) संध्याकाळी मृत्यू झाला. बुधवारी (दि. 21) सकाळी शाळकरी मुलांना कालव्यात मृतदेह आढळून आल्याने प्रकार उघडकीस आला.

शेळगाव येथील तेलओढा हद्दीत असलेल्या निरा डावा कालव्यावरील धोकादायक जीवघेण्या पुलावरून जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. शिवाय धोकादायक पुलाच्या जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. यामुळे पुलावरून जाताना लहान मुलाच्या जीवाला धोका आहे. जीवितहानी होण्याअगोदरच पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी म्हणून या संदर्भात दै.'पुढारी'ने मागील चार ते पाच वर्षांत अनेकवेळा बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतु, या पुलाचे दुरुस्तीचे काम कोणी करायचे याबाबत जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असत.

या दोन विभागांच्या टोलवाटोलवीत जीवघेण्या पुलाची दुरुस्ती रखडली आणि अखेर धोकादायक पुलावरून पडून एक मजुराचा मृत्यू झाला. या पुलाच्या दुरुस्तीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेळगाव व तेलओढा येथील ग्रामस्थांनी, महिलांनी केली असून, वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रारदेखील देण्यात येणार आहे.

जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर मयत चांदणे कुंटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी कुटुंबीय व नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकींकर, पोलिस हवालदार मोहन ठोंबरे, पोलिस पाटील उषा वाघमोडे यांनी भेट देऊन रीतसर पंचनामा केला.

…अन्यथा रास्ता रोको
शेळगाव तेलओढा निरा डावा कालव्यावरील जीवघेण्या पुलाची दुरुस्ती चार ते पाच वर्षांत का केली नाही, तो पूल नेमका जलसंपदा विभागाकडे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि कधीपासून आहे यांची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी. बबन चांदणे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा हा पूल वाहतूकीसाठी बंद करून चौपन्न फाटा येथे पालखी मार्गावर महिला, पुरुष, वयोवृद्ध, लहान मुलांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा तेलओढा ग्रामस्थांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT