कामगाराचा नदीत फेकून खून File Photo
पुणे

Crime News : गुऱ्हाळातील उसाच्या रसात भाजलेल्या कामगाराचा नदीत फेकून खून

पुढारी वृत्तसेवा

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे कामावर दारू पिऊन आल्याने झालेल्या वादातील झटापटीत ऊसाच्या गुऱ्हाळातील गरम रसात पडलेल्या जखमी कामगाराला दवाखान्यात नेतो, असे सांगून जिवंत असतानाच नदीपात्रात फेकून त्याचा खून करणाऱ्या दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरजू (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी नवनाथ तुकाराम कोंडे (वय ४२, रा.मांडवगण फराटा, ता. शिरूर) याने फिर्याद दिली आहे.

शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर (सध्या रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, मुळ रा. शीतलगढी, ता. जि. शामली, उतरप्रदेश) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ सप्टेंबर रोजी पहाटे पावणे तीन वाजता मांडवगण फराटा, (ता. शिरूर) येथील फिर्यादीचे मालकीचे जमीन गट नं १६ मधील उसाचे गुऱ्हाळामध्ये गुळ बनवण्याचे काम सुरू होते. गु-हाळावरील कामगार सरजू (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा दारू पिऊन आल्याने शेरसिंग ओमबीर कुमार व करण अनिल ठाकूर यांचेशी सरजूचे काम करण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाले. त्यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये सरजू हा तोल जाऊन उसाच्या गरम रसाच्या कढईत पडल्याने शेरसिंग कुमार व करण ठाकुर यांनी सरजूला कढईच्या बाहेर काढले. त्यावेळी सरजू हा भाजल्यामुळे जखमी झालेला असताना व जिवंत असताना शेरसिंग कुमार व करण ठाकुर यांनी त्यास गाडीवर बसवून उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत फिर्याद दाखल झाल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT