पुणे

कडूस : कुरवंडीच्या तोत्रे यांचा गाडा ठरला ‘घाटाचा राजा’

अमृता चौगुले

कडूस(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : कमान येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणार्‍या श्री हजरत राजामोगल बाबा तसेच श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत कुरवंडीच्या कै. अविनाश लक्ष्मण तोत्रे यांचा गाडा 'घाटाचा राजा' किताबाचा मानकरी ठरला. सकाळी चास, कमान गावातून पारंपरिक वाद्याच्या गजरात देवास हारतुरे, मांडव-डहाळे पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. बैलगाडा घाटाचे उद्घाटन सरपंच योगेश नाईकरे, उद्योजक संदीप मुळूक यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते घाटात नारळ फोडून भव्यदिव्य स्वरूपात बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली. बैलगाडे पाहण्यासाठी बैलगाडाशौकीन मोठी गर्दी करीत आहेत.

कमान गावच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी 150 बैलगाडे धावले. त्यामध्ये कै. अविनाश शिंदे यांनी पहिल्या शर्यतीत पहिला क्रमांक प्राप्त केला. दुसर्‍यात पहिला क्रमांक सदाशिव गुंजाळ यांच्या बैलगाड्याने मिळविला. तिसर्‍यात पहिला क्रमांक महादू ढोकरे यांच्या गाड्याने मिळविला. पहिल्या दिवशीच्या अंतिम शर्यतीत प्रथम चास येथील बाळासाहेब कंद, व्दितीय क्रमांक चास येथीलच विशाल मुळूक यांच्या गाड्याने, तर पिंगळवाडी येथील रोहन भवारी यांच्या गाड्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

आकर्षक गाड्यांमध्ये यात्रा कमेटीचे मच्छिंद्र दातेरे व बबन कोबल यांच्या गाड्याला क्रमांक मिळाला. कुरवंडीच्या कै. अविनाश तोत्रे यांच्या गाड्याला 'घाटाचा राजा' किताब देण्यात आला. बैलगाडा घाटासाठी नितीन नाईकरे, अविनाश नाईकरे यांनी जागा उपलब्ध करून दिली. घाट तयार करण्यासाठी उद्योजक संदीप मुळूक, विशाल शिंदे, विकास नाईकरे, वैभव राक्षे, उमेश ढमाले, गणपत मुळूक यांनी योगदान दिले. मंदिरांवर आकर्षक विद्युतरोषणाई संदीप नाईकरे, संदीप नाईकरे, विकास नाईकरे व गणेश मुळूक यांनी केली. यात्रेचे नियोजन समस्त ग्रामस्थ, यात्रा कमेटी, शिक्षकवृंद, तरुण मंडळांनी केले होते.

SCROLL FOR NEXT