टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुंड पर्यटनस्थळी कुकडी नदीवर सन 2011 मध्ये उभारलेला झुलता पूल अखेर प्रशासनाने बंद केला आहे. पूल धोकादायक स्थितीत असून, दुरुस्तीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू होते. मात्र, दै. ‘पुढारी’ने 17 जुलै रोजी ‘झुलत्या पुलावर मृत्यूचे सावट’ या मथळ्याखाली विशेष वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत शनिवारी (दि. 19) पूल बंद करण्याची कारवाई केली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिरूर शाखा अभियंता अनिल गावडे, टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर घोडे व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूल बंद करण्यात आला. पर्यटन हंगामात क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे पुलावर अपघाताचा धोका वाढत होता.
कुकडी नदीवर असलेले रांजणखळगे, कुंडाच्या दोन्ही बाजूंनी असलेली मळगंगादेवीचे मंदिरे आणि इतर पर्यटन यामुळे पुणे-अहिल्यानगर सीमेवरील हे पर्यटनस्थळ वर्षभर गर्दीने गजबजलेले असते. या पार्श्वभूमीवर कुंड परिसरातील पर्यटन आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता सुरक्षित पूल व सुरक्षाव्यवस्थेची गरज अधोरेखित होत आहे. याबाबत दै. ’पुढारी’ने आवाज उठवताच प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांनी हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला.
एक वृत्त, एक जागृती आणि एक निर्णायक कृती दै. ‘पुढारी’च्या वृत्ताचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. एक वृत्त, एक जागृती आणि एक निर्णायक कृती, या त्रिसूत्रीच्या आधारे पूल बंद करण्यात आला असून, भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रामसभेच्या ठरावानुसार पुलाच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन आरसीसी पूल बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्रव्यवहार केला आहे. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत पूल पूर्णपणे बंद राहील. कुंड परिसरातील पर्यटन आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता सुरक्षित पूल व सुरक्षाव्यवस्थेची गरज आहे.अरुणा घोडे, सरपंच, टाकळी हाजी