पुणे

कृष्णकुमार गोयल हे पुण्याचे कोहिनूर : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृष्णकुमार गोयल यांनी पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात चांगुलपणा वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांना गुरूवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान करणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. ते खर्‍या अर्थाने पुण्याचे कोहिनूर आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित गुरुवर्य शंकररराव कानिटकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित केले. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पुरस्कारार्थी तथा खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रा.अरविंद पांडे, सुरेश तोडकर, राजमाला गोयल, डॉ. जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, आज समाजात चांगले काम करणार्‍या व्यक्तींची गरज आहे. कृष्णकुमार गोयल सेवाभावी मार्गावर आपल्या कर्तृत्वाच्या आधारे पुढे जात आहेत. ते शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. जगात आज संपत्तीपेक्षा गुणांना महत्त्व दिले जात आहे. ज्ञानाला संस्कारांची जोड असल्यास विद्यार्थी समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करतात. शिक्षणाच्या माध्यमातून एकता, शांतता, संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून कार्य होत आहेत आणि तसे विद्यार्थी घडत आहेत. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य असून संस्थेचे रुपांतर लवकरच मॉडर्न विद्यापीठात व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

समाजातील प्रामाणिक व्यक्तिमत्वाला पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे नमूद करून डॉ. करमळकर म्हणाले, गुणवान व्यक्तींचा सन्मान ही पुण्याच्या भूमीची परंपरा आहे. पुण्यातील शैक्षणिक क्षेत्राला गती देण्याचे काम अनेक संस्था आणि व्यक्तींनी केले. अशा गुरुवर्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणे ही समाधानाची बाब आहे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारपूर्ण व्यक्तिमत्व घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सचिव शामकांत देशमुख यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली. मुनगंटीवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत गोयल यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. या पुरस्काराने कामाचा सन्मान होणे ही प्रेरणा देणारी बाब आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे हा पुरस्कार दिला जात असल्याने त्याचे वेगळेच महत्त्व आहे. जिद्दीने परिस्थितीला सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले.

– कृष्णकुमार गोयल अध्यक्ष, खडकी एज्युकेशन सोसायटी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT