Krishna Basin Irrigation Project Pudhari
पुणे

Krishna Basin Irrigation Project: कृष्णा खोरे प्रकल्प दुरुस्तीमध्ये गती; 3,540 कोटींपैकी 99 टक्के निधी खर्च

सिंचन व्यवस्थेला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी शिंदे

पुणे: राज्यातील जलसंपदा विकासात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कृष्णा खोरे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत 2025-26 या आर्थिक वर्षात मोठी झेप घेतली गेली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पांसाठी 3 हजार 540 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी तब्बल 3 हजार 494 कोटी रुपये विविध कामांवर खर्च करण्यात आले असून, सुमारे 99 टक्के निधीचा उपयोग झाला आहे. निधीच्या उच्च प्रमाणातील वापरामुळे प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळाली आहे.

यंदाच्या वर्षात केवळ निधी खर्चावर भर न देता त्याचा परिणामकारक उपयोग होईल, यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले. विशेषतः मोठ्या प्रकल्पांमध्ये दूधगंगा, वारणा, वाकुर्डे (उपसा सिंचन), जिहे-कठापूर, कृष्णा-कोयना, टेभू, निरा-देवघर, कुकडी आदी प्रकल्पांचा समावेश असून, या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला.

या अंतर्गत कालव्यांचे रुंदीकरण, अस्तरीकरण, पाण्याची गळती रोखण्यासाठी बंदिस्त वितरण व्यवस्था उभारणे, पाणी वितरण प्रणाली अधिक सक्षम करणे, लाभक्षेत्र विकास यांसारख्या कामांना प्राधान्य देण्यात आले. याशिवाय जुनी धरणे आणि कालवे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची देखभाल आणि पुनर्बांधणी करून पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

फेरनियोजनातून वंचित भागांना पाणी कृष्णा खोरे महामंडळांतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील प्रकल्पांचे फेरनियोजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून अपूर्ण किंवा कमी क्षमतेने कार्यरत असलेल्या योजनांची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्यात आली. या प्रक्रियेमुळे पूर्वी सिंचन व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्याने उपसा सिंचन योजना राबवून उंच भागातील व दुष्काळप्रवण क्षेत्रांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्नकरण्यात आला.

724 प्रकल्पांचा समावेश

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात एकूण 724 प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये 35 मोठे, 50 मध्यम आणि तब्बल 639 लघु प्रकल्पांचा समावेश असून, पुणे विभागाची जलव्यवस्थापनाची मोठी जबाबदारी या यंत्रणेवर आहे. या सर्व प्रकल्पांमुळे सुमारे 21 हजार 26 लाख हेक्टर इतक्या विस्तीर्ण क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. तसेच एकूण पाणीसाठा क्षमता 560 टीएमसी इतकी असून, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी ही क्षमता अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT