पुणे: घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर गुन्हे शाखेने 6 हजार 455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. गणेश विसर्जनाच्या दिवशी हा कट रचल्याचे म्हटले आहे. कोथरूडमध्ये आपल्या टोळीची दहशत कमी झाली असून, टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवतो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगून नीलेश घायवळ याने गणेशोत्सव विसर्जन दिवशी 6 सप्टेंबर 2025 रोजी कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातूनच पुढे 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभे असलेल्यांवर घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती.
मयूर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय 29, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), मयंक मॉन्टी विजय व्यास (वय 29, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश सतीश राऊत (वय 32, रा. गावडे चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड), दिनेश रामभाऊ फाटक (वय 28, रा. माथवड चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डन, कोथरूड), आनंद अनिल चांदलेकर (वय 24, रा. श्रीराम कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), मुसाब इलाही शेख (वय 33, रा. सिद्धिविनायक कॉलनी, कोथरूड), जयेश कृष्णा वाघ (वय 36, रा. केळेवाडी, कोथरूड), अक्षय दिलीप गोगावले (वय 29, रा. बराटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, हा गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांत गँगस्टर नीलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून, त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. त्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.
कोथरूड येथील मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ 17 सप्टेंबर 2025 रोजी काही जण गप्पा मारत थांबले असताना घायवळ टोळीतील गुंड दोन मोटारसायकलवरून तेथे आले. तेथे थांबलेल्यांना ’तुम्हाला लय माज आला आहे का? कशाला थांबला आहे येथे? हा आमचा एरिया आहे, रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघ रे यांना... आज यांची विकेटच टाकू, असे म्हणत त्यांनी धमकावून शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता मयूर कुंबरे याने त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर पिस्टलमधून गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये नीलेश घायवळ, मयूर कुंबरे व त्याचे इतर साथीदार यांनी 6 सप्टेंबर 2025 रोजी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी या गुन्ह्याचा कट रचला होता. त्या वेळी नीलेश घायवळ इतर आरोपींना म्हणाला की, कोथरूड भागात आपली दहशत कमी झालेली आहे.
आपले टोळीचे वर्चस्व कोथरूडमध्ये वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवतो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगितले होते. हा कट पूर्णत्वास नेण्यासाठी नीलेश घायवळ याने शस्त्रे आणि आर्थिक साह्य देऊन हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी हा गुन्हा स्वत:चा व टोळीचा आर्थिक फायदा करण्याकरिता संघटितपणे केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपींवर 25 सप्टेंबर 2025 रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. नीलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरूड भागात 2 बेकायदेशीर इमारती बांधल्या असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी पुणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 122 साक्षीदार तपासले आहेत. तसेच 6 साक्षीदारांचे जबाब नोंद केली आहेत.
अटक केलेल्या 9 आरोपींविरुद्ध 12 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, विशाल चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील राऊत, संतोष डोळस, नितीन काळे व उत्तेकर यांनी केली आहे.
अटक करण्याकरिता इंटरपोलची मदत
या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले 1 पिस्टल, 1 रिकामी पुंगळी, नीलेश घायवळ याच्या घरझडतीमध्ये 2 जिवंत काडतुसे, 4 रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात 9 जणांना अटक करण्यात आली असून, 8 जण अजून फरार आहेत. त्यांना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले आहे. नीलेश घायवळ याला अटक करण्याकरिता इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे.