पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील कोरेगाव पार्कचे तापमान मंगळवारी राज्यात सर्वाधिक 42.1 अंशांवर गेले होते. दिवसभर अंगाची काहिली होत असताना सायंकाळी मात्र हलक्या पावसाने आल्हाददायक वातावरण तयार झाले. राज्यातील बहुतांश भागात दिवसा कडक ऊन तर सायंकाळी हलका पाऊस पडत आहे. पुणे जिल्हा मंगळवारी राज्यात सर्वात उष्ण ठरला. कोरेगाव पार्क (42.1), तळेगाव ढमढेरे (41.3), शिरूर (40.9), वडगोव शेरी (40.6), दुदलगाव (40.3), राजगुरुनगर (40.2), लवळे (40) अंश सेल्सिअस इतके तापमान होते. सर्वच तालुक्यांचे सरासरी तापमान 38 ते 39अंशांवर गेल्याने मंगळवारी प्रंचड उकाडा जाणवत होता.
हलक्या पावसाचा इशारा
रविवारी शहरात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली, त्यामुळे कमाल तापमान 37 अंशांवरून 34 ते 35 अंशांवर खाली आले. सोमवारी तापमानात वाढ झाली. मंगळवारीही दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी 5 नंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला व हलका पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले.