पुणे : कोरेगाव भीमा येथे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, खासदार रामदास आठवले यांनी केली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आठवले म्हणाले की, लोकसभेला आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. विधानसभेलाही आम्ही जागा मागितल्या. परंतु त्या दिल्या नाहीत. त्यामुळे आता एक मंत्रिपद शिल्लक आहे. ते रिपब्लिकन पार्टीला मिळावे, अशी महायुतीकडे मागणी केली आहे. पुण्यात रिपब्लिकन पक्षाची फार मोठी ताकत आहे. मागील वर्षी आम्हाला उपमहापौरपद दिले होते. परंतु येत्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महापौरपद मिळावे, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराड याचाच मुख्य हात असल्याचा आरोप केला जात आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने कराड याला खंडणीच्या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास झाला पाहिजे. बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असेल, तर कराडला शिक्षा झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.
वंजारीविरुद्ध मराठा किंवा ओबीसी विरुद्ध वंजारी असा वाद होऊ नये. बीडमधील खून प्रकरण म्हणजे मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी विरुद्ध वंजारी असा वाद नाही. कंपन्यांना दमबाजी करत खंडणी मागणार्यांच्या विरोधातील हा लढा आहे. अशा पद्धतीने दमबाजी करत खंडणी मागितली जात असेल, तर एकही उद्योग जिल्ह्यात येणार नाही, अशी भीती रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ नये, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. याबाबत आठवले म्हणाले, पोलिसांनी कराडला अटक केली आहे. मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही.
देशमुख खून प्रकरणात जे दोषी असतील त्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनीच केली असल्याचे आठवले म्हणाले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.