पुणे: पेशाने शिक्षक असलेल्या मैत्रिणीच्या घरी भेटायला आल्यानंतर २४ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झालेल्या मित्राला कोंढवा पोलिसांनी गुजरात राज्यातील वडोदरा येथून अटक केली.
यश कैलास भूलचंदानी (वय २४,रा. मोहाडी, जि. म्हैसाणा, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले १४ लाख ३९ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शिक्षिका असून, अविवाहित आहेत. तर, आरोपी यश याचे देखील एमबीएचे शिक्षण झाले आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वी दोघांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय झाला होता.
यश हा पुण्यात येण्यापूर्वी केनियात नोकरी करीत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी तो पुण्यात आला होता. एका टुरिस्ट कंपनीत तो काम करीत होता. २५ जून रोजी यश फिर्यादी मैत्रिणीच्या कोंढवा खुर्द येथील घरी भेटण्यासाठी आला होता. दरम्यान, तरुणी त्याच सोसासटीत राहत असलेल्या मावशीच्या घरी जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेली होती.
त्या वेळी यश हा एकटा तरुणीच्या घरी होता. त्याने तरुणीच्या बेडरूममधील कपाट पाहिले. तेव्हा त्याला त्यामध्ये रोकड व सोन्याचे दागिने दिसले. त्याने ते चोरी करून पळ काढला. घरातून जाताना त्याने माझी तब्बेत बरी नाही, त्यामुळे मी जातो असे सांगून पोबारा केला होता.
तरुणी घरी परतली तेव्हा तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तिने याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी यश हा तरुणीसोबत स्नॅप चॅटच्या माध्यमातून संपर्कात होता.
त्याचा मोबाईल क्रमांक देखील नव्हता. तांत्रिक विश्र्लेषणात कोंढवा पोलिसांनी यश याची माहिती काढली. त्या वेळी पोलिस कर्मचारी केशव हिरवे यांना तो वडोदरा येथे असल्याची माहिती मिळाली. चार दिवस कोंढवा पोलिसांचे पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. पासपोर्टचे काम करण्यासाठी तो वडोदरा येथे आला असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे निरीक्षक प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, कर्मचारी रवींद्र चिप्पा, विशाल मेमाणे, राहुल शितोळे, केशव हिरवे यांच्या पथकाने केली.