पुणे : कोंढवा परिसरात वाढत्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईत मलिकनगर व बाबानगर परिसरातील 3800 चौरस फुटातील बांधकामे पाडण्यात आली आहेत. कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आल्यावर महापालिकेने येथील अतिक्रमण काढण्यासाठी 40 अभियंत्यांची नियुक्ती केली असून, या पथकाने ही कारवाई केली आहे.
कोंढवा परिसरात 2022 पासून सुमारे 70 ते 80 मोठ्या अनधिकृत बांधकामांची नोंद झाली आहे. शहर अभियंता प्रशांत वाघमारे व अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-अभियंता दीपक सोनावणे यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. या इमारतींवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी या ठिकाणी वास्तव्य करू नये, अथवा खरेदी-विक्री व्यवहार करू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कोंढवा येथील मलिकनगर येथील चार मजली आरसीसी आणि साईबाबानगर येथील तीन मजली आरसीसी अशा एकूण सुमारे 3,800 चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अलीकडील सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उघडकीस आली आहेत. या बांधकामांपैकी काही ठिकाणी नागरिक वास्तव्यास असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.या इमारती रिकाम्या करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांनी दिली.
ही बांधकामे दाट वस्तीच्या भागात असल्याने प्रशासनाला अतिक्रमणविरोधी कारवाई करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाईची मोहीम राबवली जात आहे.
बांधकाम विभागाने स्पष्ट केले की, एक ते दोन महिन्यांत सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात येतील. यासोबतच सातत्याने अनधिकृत बांधकाम करणार्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहे. तसेच पोलिसांची मदत घेऊन ही बांधकामे पाडली जाणार आहेत.