Kolwadi Vehicle Theft Case Pudhari
पुणे

Kolwadi Vehicle Theft Case: कोळवाडीत चोरीच्या बलेरोसह चोरट्यांचा थरार! पिस्तूल रोखले, ग्रामस्थांनी दोन जणांना पकडले

सहा जणांच्या टोळीचा गावकऱ्यांनी केला प्रतिकार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, चौघांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: कल्याण -अहिल्यानगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे आज (दि. १२) सकाळी साडेआठच्या सुमारास चोरीच्या बलेरो जीपमुळे अक्षरशः थरार उडाला. सहा जणांच्या चोरट्यांच्या टोळीने ग्रामस्थांच्या तावडीतून सुटण्यासाठी पिस्तूल रोखून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दगडफेकही केली; मात्र संतप्त ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता चोरट्यांना घेरत जोरदार प्रतिकार केला. या झटापटीत दोन चोरांना पकडून ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले, तर चौघे पसार झाले.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, कोल्हार येथून चोरीस गेलेली बलेरो जीप कोळवाडी परिसरात आल्याचे येथील पाहुण्यांच्या लक्षात आले. ही जीप आपल्या मावसभावाची असल्याची खात्री होताच त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. काही क्षणांतच गावकऱ्यांनी संशयित वाहनाला घेराव घालत चोरट्यांचा मार्ग अडविला.

अचानक घेराव पडल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांवर पिस्तूल रोखून दहशत निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता दगडफेकही सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, ग्रामस्थ मागे हटले नाहीत. उलट संतप्त नागरिकांनी चोरट्यांवर झडप घालत त्यांना जेरबंद केले. पकडलेल्या दोघांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला असून त्यांना येथेच्छ चोप दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या ताब्यातील दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्या ताब्यातून बलेरो जीप, सुरा, कटावणी, दोरखंड (रस्सी) तसेच पिस्तूलसदृश हत्यार आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही टोळी वाहनचोरीबरोबरच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे, पकडण्यात आलेले दोन्ही संशयित पोलिसांसमोरही स्वतःची ओळख सांगण्यास नकार देत असून त्यांची खरी नावे, पत्ते आणि टोळीचे जाळे उघड करण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. फरार झालेल्या अन्य चार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केल्याची माहिती आहे.

भरदिवसा गावात घुसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी दिलेला प्रतिकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, नागरिकांच्या धाडसामुळे चोरीची बलेरो हस्तगत झाली आणि दोन संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या घटनेमुळे ग्रामीण भागातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT