Mango Pudhari
पुणे

Pune Hapus Mango: कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात; कर्नाटक हापूसची आवक वाढली

हवामानबदलाचा फटका; पुणे मार्केट यार्डात हापूसच्या आवकेत बदल, खवय्यांचा कल कर्नाटक हापूसकडे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गोड चवीच्या कोकणातील हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात या आंब्याची आवक घटली आहे. पुढील दहा दिवसच या आंब्याची चव चाखता येणार आहे. तर, दुसरीकडे कर्नाटक हापूसचा हंगाम बहरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक दुप्पट होत आहे. त्यामुळे खवय्यांनी आता कर्नाटक हापूसकडे आपला मोर्चा वळविला आहे. 15 जूनपर्यंत कर्नाटक हापूसची आवक सुरू राहणार आहे.

हवामानबदलाचा सर्वाधिक फटका कोकणातील हापूसला बसला. मोहर गळाल्याने हंगामाच्या सुरुवातीला या आंब्याची आवक कमी होत होती. त्यामुळे गुढीपाडव्यासह अक्षय तृतीयेपर्यंत या आंब्याचे भाव चढेच होते. मात्र, त्यानंतर आवक वाढल्यामुळे भाव आटोक्यात आले होते. रविवारी बाजारात हापूसच्या दीड ते दोन हजार पेटींची आवक झाली. घाऊक बाजारात कच्च्‌‍या हापूसच्या 5 ते 9 डझनाच्या पेटीला 1 हजार 200 ते 2 हजार रुपये भाव मिळाला.

तर, तयार आंब्याची 1 हजार 500 ते 3 हजार रुपये दराने विक्री सुरू आहे. किरकोळ बाजारात डझनाला दर्जानुसार 400 ते 800 रुपये मोजावे लागत आहेत. हवामानबदल, त्यातच मॉन्सून अंदमानात पोहचल्याने हंगाम लवकर संपणार आहे. तर, दुसरीकडे कर्नाटक हापूसलाही हवामानबदलाचा फटका बसला आहे. यंदा महिनाभर विलंबाने आवक वाढली आहे.

रविवारी (दि. 17) लाकडाच्या 3 ते 5 डझनाच्या सुमारे 15 हजार पेट्या, सुटा 20 किलोच्या 8 हजार क्रेट, तर 2 डझनांच्या 20 हजार ते 25 हजार बॉक्सची आवक झाली. 3 ते 5 डझनांच्या हापूसच्या पेटीला 800 ते 1 हजार 200 रुपये भाव मिळत आहे. तर, चार डझनांच्या पायरीला 500 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे. याखेरीज हापूस 40 ते 60 रुपये किलो, लालबाग 25 ते 30 रुपये आणि बदाम 30 ते 40 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

कोकणातील हापूसची आवक घटली आहे. मागील आठवड्यात 5 हजार पेटी होणारी आवक आता दीड ते 2 हजार पेटीच आवक होत आहे. मॉन्सूनही अंदमानात दाखल झाल्याने नेहमीच्या तुलनेत 10 दिवस आधीच हंगाम संपणार आहे.
युवराज काची, कोकण हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड
हवामानबदलामुळे यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम विलंबाने सुरू झाला आहे. मात्र, आता आवक वाढली असून, हंगाम बहरला आहे. कोकणातील हापूसची आवक घटल्यामुळे लोक कर्नाटक हापूस खाण्यास पसंती देत आहेत. कर्नाटक हापूसच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT