पुणे

अनधिकृत, तुटक्या, विचित्र नंबर प्लेटला दणका !

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनधिकृत चुकीच्या नंबर प्लेट लावणे, तुटलेल्या नंबर प्लेट लावणे, चित्र-विचित्र आकारात नंबर प्लेट लावणे, नंबर प्लेटवर मास्किंग करणे, यांसारख्या विविध कारणांमुळे राज्य महामार्ग पोलिसांनी सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक वाहनचालकांवर धडक कारवाई केली आहे. अशीच स्थिती दरवर्षाला राहिली, तर वाहनांसंदर्भातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे महामार्ग पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत आता प्रत्येक वाहनाला 'एसएसआरपी' (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बंधनकारक करण्यात आली आहे.

मात्र, तरीसुद्धा अनेक वाहनचालक आपल्या आवडीच्या व्हीआयपी क्रमांकाची नंबर प्लेट लावण्यासाठी किंवा अनेक दोन नंबरची कामे करण्यासाठी या एचएसआरपी नंबर प्लेट तोडून त्याजागी नव्या नंबर प्लेट लावत आहेत. अशा सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक वाहनचालकांवर राज्यातील विविध महामार्गांवर सन 2023 या वर्षांत महामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे.

वाहनांसंदर्भातील गुन्हे रोखण्याचा उद्देश

केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 50 नुसार वाहनाला आता एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारकर आहे. वाहनांसंदर्भातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ही नंबर प्लेट उपयुक्त ठरते. खासकरून नंबर प्लेट बदलून अनेक वाहने गुन्ह्यांसाठी महामार्गांवर पळवली जातात. त्यांची विशेष तपासणी महामार्ग पोलिसांकडून करण्यात आली. त्यासंदर्भातील माहिती राज्य महामार्ग पोलिसांनी नुकतीच प्रसिध्द केली आहे.

असाही होतो वापर…

वाहनांची नंबर प्लेट बदलून, झाकून आणि तोडून काय करणार, असा प्रश्न अनेक सर्वसामान्य नागरिकांना पडतो. मात्र, अशी कामे शक्यतो दोन नंबरची कामे करणारी व्यक्ती सर्रासपणे करते. स्मगलिंगच्या कामासाठी आवश्यक असलेल्या वाहनाला असे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच, चोरीच्या वाहनांसाठीसुद्धा याचा वापर होतो.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT