ओतूर: खेळ... हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर येते ते युवक, युवती, विद्यार्थी यांनी भरलेले मैदान, धावणारे खेळाडू, प्रेक्षकांचा जल्लोष आणि निरोगी स्पर्धा. मुळात कोणताही खेळ हा नेहमी खेळण्यासाठी असतो. शारीरिक हालचाल, सांघिक भावना, मैदानातील संघर्ष आणि विजयाचा आनंद हे सर्व खेळांचे अविभाज्य भाग आहेत. मात्र, सध्याच्या काळात खेळांचे हे मूळ स्वरूप वेगाने बदलत आहे.
आपल्याकडे आता कोणताही खेळ मैदानात जाऊन खेळण्याऐवजी ऑनलाइन पाहिला जातो. टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनवर जगभरातील सामने पाहणे ही आता नित्याची गोष्ट झाली आहे. याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे, तरुण पिढी मैदानावर जाऊन खेळण्यापेक्षा मोबाईलवर खेळण्यात अधिक रमलेली दिसते. (Latest Pune News)
पूर्वी गल्ली-बोळांत, मैदानावर क्रिकेट, फुटबॉल, कबड्डीचे सामने रंगायचे. मुले दिवसभर मातीत खेळून, घाम गाळून घरी परत यायची. त्यातून मिळणारा शारीरिक व्यायाम आणि मानसिक समाधान अनमोल होते.
आज ती मैदाने रिकामी दिसत आहेत आणि त्या जागी प्रत्येक हातात मोबाईल दिसतो आहे. फुटबॉलसारखा खेळ जो मैदानात धावून, एकमेकांशी संवाद साधून, रणनीती आखून खेळायचा असतो, तोच खेळ जेव्हा तरुण पिढी मोबाईलवर खेळताना दिसते, तेव्हा नेमके काय बोलावे हे सुचत नाही.
खेळाचे मूळ हरवणे
खेळाचा आत्मा हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक गुंतवणुकीत असतो. मोबाईलवर खेळणे म्हणजे खेळाच्या या मूळ आत्म्यापासून दूर जाण्यासारखे आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने एकत्रितपणे या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे.
मुलांना पुन्हा मैदानाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मैदानांची उपलब्धता, खेळांचे प्रोत्साहन आणि खेळाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. खेळ हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. मोबाईलवरील खेळांचे मर्यादित वापर करून, तरुण पिढीने पुन्हा मैदानाकडे वळावे, तरच खेळाचे मूळ स्वरूप आणि त्याचे फायदे टिकून राहतील.
मानसिक आरोग्याच्या समस्या
मोबाईलवरील खेळांचे व्यसन मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव आणि झोपेच्या समस्यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण करत आहेत. आभासी जगात रमल्यामुळे त्यांना खर्या जगातील आव्हानांना सामोरे जाणे कठीण होते.
मैदानी खेळांच्या अभावामुळे आरोग्यावर परिणाम
मैदानी खेळांच्या अभावामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यांची शारीरिक क्षमता कमी होत आहे. मैदानावर खेळताना मुले एकमेकांशी संवाद साधतात, भांडतात, रुसतात आणि पुन्हा एकत्र येतात. यातून त्यांच्यात सामाजिक कौशल्ये, सहानुभूती आणि सांघिक भावना विकसित होतात. मोबाईलवर खेळताना हे अनुभव मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांचा सामाजिक विकास खुंटतो.