पुणे

भीक मागण्यासाठी बालिकेचे अपहरण; श्रीगोंदा येथून अपहरणकर्त्या सराईत महिलेला अटक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळविण्याच्या उद्देशाने एका महिलेने तीन वर्षांच्या मुलीचे कोरेगाव पार्क परिसरातून अपहरण केले. त्यानंतर ती फरार झाली होती. अखेर कौशल्यपूर्वक तपास करून पोलिसांनी श्रीगोंदा येथून अपहरकर्त्या महिलेला बेड्या ठोकून अपहृत मुलीची सुखरूप सुटका केली.

उषा नामदेव चव्हाण (वय 40, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उषा ही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तब्बल पाच दिवस 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज व हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले.

याबाबत पोलिसांनी सांगितले, एक 23 वर्षांची महिला फुगे विकत असते. ती 23 मे रोजी दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्या वेळी तिच्या 3 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर मुलगी मिळून येत नाही, हे लक्षात आल्यानंतर 25 मे रोजी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सहायक निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तब्बल 5 दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण हिला पकडण्यात आला.

उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून, लग्नात तिने 30 हजार रुपये हुंडा घेतला होता. याच लालसेतून तिने मुलीला पळवून आणले होते. तिला अटक करण्याची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक निरीक्षक दीपाली भुजबळ, प्रेरणा कुलकर्णी, उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी केली.

सीसीटीव्ही कॅमेरे अन् पिशवीवरील नाव ठरले धागा

उषा ही सराईत गुन्हेगार आहे. तिने मुलीचे अपहरण केल्यानंतर कॅमेर्‍यात येऊ नये म्हणून काळजी घेतल्याचे दिसून येते. प्रत्येक वेळी तिने आपला चेहरा झाकून घेतला आहे. केवळ मुलगी तिच्या काखेला दिसून येत होती. मुलीच्या कपड्यावरून पोलिस तिचा पाठलाग करत होते. या वेळी पोलिसांनी तब्बल 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. स्टेशन परिसरात उषा एका व्यक्तीसोबत बोलताना तिच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीवर बगाडे रिटेलर्स असे नाव दिसून आले. बगाडे नावाच्या पिशवीचा शोध घेतला असता, तो नगर जिल्ह्यात असल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील कापसेवस्ती येथून पोलिसांनी उषाला ताब्यात घेतले.

श्रीगोंदा येथील कापसेवस्ती येथून अपहृत मुलीची सुखरूप सुटका करून आरोपी महिलेला अटक केली आहे. भीक मागण्यासाठी व हुंड्याचे पैसेे मिळविण्यासाठी संबंधित मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

                               – विनायक वेताळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोरेगाव पार्क

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT