पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नातेवाईक तरुणाने गळफास घेतल्याने सहा जणांनी मिळून रिक्षाचालक तरुणाचे अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली येथे मंगळवारी (दि. 20) रात्री दहाच्या सुमारास घडली.
महेश देवेंद्र येमगड्डी (22, रा. चिंचोली) यांनी बुधवारी (दि. 21) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू लक्ष्मण देवरमनी (वय 49), अक्षय शिवराज देवरमनी (वय 24), शिवराज लक्ष्मण देवरमनी (वय 58), वैभव सुरेश नाईक (वय 30), दीपक दिलीप सौदे (वय 37) यांना अटक केली आहे. तर, कुणाल कटारे (सर्व रा. देहूरोड) याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येमगड्डी हे रिक्षाचालक असून त्यांची आशिष देवरमनी (26) यांच्याशी मैत्री होती. दरम्यान, आशिष यांनी सोमवारी (दि. 19) गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा राग मनात धरून आशिष यांचे नातेवाईक व आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. फिर्यादी यांना रिक्षामध्ये जबरदस्तीने बसविले. तुझ्यामुळे आमचा आशिष गेला, तुला जीवंत सोडत नाही. तुझा मर्डरच करतो, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच, एकाने फिर्यादी यांचा खून करण्यासाठी सुरा मारला. मात्र, फिर्यादी यांनी तो वार चुकवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना सेन्ट्रल चौक, देहूरोड येथे रिक्षातून रस्त्यावर ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद दळवी तपास करीत आहेत.