भामा आसखेड: खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी (दि.2) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे कैऱ्या गळून पडल्या, तर उन्हाळी बाजरी व भुईमूग, गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.
गुरुवारी सकाळपासून हवामानात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दोननंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यानंतर गारांचा पाऊस सुरू झाला. पाऊस सलग दोन तास सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या गळून पडल्या. उन्हाळी बाजरी भुईसपट झाली. भुईमूग पिकात पाणी साचल्याने नुकसान झाले. गव्हाच्या पिकाचे देखील नुकसान झाले.
पाईट, कोये, वांद्रा, कुरकुंडी, करंजविहिरे, वाहगाव, तळवडे, चांदुस, आसखेड, किवळे, धामणे, वाकी तर्फे वाडा, पाळू,अहिरे, हेद्रुज, कोरेगाव, वाघू, टेकवडी, आडगाव, सुपे, भलवडी, सातकरवाडी, कोहिंडे, विराम, आंभु, वेळावले, आंबोली आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.
भामा आसखेड धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडल्याने धरणाचे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अचानक झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदारांनी पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी व ग्रामसेवकांना द्याव्यात, अशी मागणी कासारी गावचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी दत्तात्रय सखाराम होले यांनी केली आहे.