Pune Khed Farmer Marriage Fraud Case April 2025
खेड : लग्न जुळवण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याची १ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी चार महिलांविरुद्ध गुरुवारी (दि. १२) रात्री गुन्हा दाखल केला.
याबाबत आनंदा सयाजी जैद (वय ६०, रा. जैदवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. ज्योती संतोष तांबोळी (वय ४०, रा. वडगाव सहाणी, ता. जुन्नर ) या महिलेने सुवर्णा उत्तम गव्हाणे (वय २८, रा. उमरगा, जि. धाराशिव) हिच्यासोबत फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील (वय २८) याचे लग्न जुळवण्याचे आमिष दाखवले. यासाठी ज्योती तांबोळी, सुवर्णा गव्हाणे, तसेच सुवर्णाची मामी अनुसया राजेंद्र मोरे (वय ५०, रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि मावशी मनीषा बाळू कदम (वय ४५, रा. यशवंत कॉलनी, निलंगा, जि. लातूर) यांनी संगनमत करून फिर्यादीकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले.
दरम्यान, दि. २२ एप्रिल २०२५ ला दुपारी २ वाजेपासून ते २५ एप्रिल २०२५ला पहाटे ५ या कालावधीत जैदवाडी (ता. खेड) येथे घाईघाईने लग्न लावून देण्यात आले. मात्र, लग्नानंतर मुलगी पळून गेली. फिर्यादींना लग्नात नाहक खर्च करावा लागला. आरोपींनी घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचा आरोप जैद यांनी फिर्यादीत केला आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्योती तांबोळी, सुवर्णा गव्हाणे, अनुसया मोरे, मनीषा कदम या चार महिलांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला असून, लवकरच त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.