खेड: राजगुरुनगर शहरातील होलेवाडीत शनिवारी (दि. 3) भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दागिने, रोकड आणि अन्य साहित्य असा एकूण 68 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मोतीलाल कांतिलाल गदिया (वय 59, रा. श्री अपार्टमेंट, पाबळ रस्ता, होलेवाडी, राजगुरुनगर) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गदिया हे व्यावसायिक आहेत. शुक्रवारी (दि. 2) रात्री संपूर्ण गदिया कुटुंब घर बंद करून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते.
शनिवारी दुपारी दीड वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेने मोतीलाल गदिया यांना मोबाईलवरून संपर्क साधून घराच्या तीन दरवाजांची कुलपे तुटलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर मोतीलाल यांच्या जवळच राहात असलेल्या बहिणीने घराची पाहणी केली असता कपाटे उघडी आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले.
त्यानंतर गदिया कुटुंब रात्री साडेनऊ वाजता घरी परतले असता चोरीची खात्री झाली. चोरट्यांनी घरातील कपाटे तोडून सोन्याचे हार, मंगळसूत्र, बांगड्या, चेन, बेसलेट, अंगठ्या, पेंडंट, चांदीची भांडी, घड्याळे आणि 10 लाखांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले. चोरीचा एकूण ऐवज अंदाजे 68 लाख 2 हजार रुपयांचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गदिया यांच्या इमारतीभोवती असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.
त्यात दोन चोरटे रिकामे येऊन जाताना बॅग घेऊन जाताना दिसून येत असल्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले. चोरट्यांनी शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरात प्रवेश केला व चोरी केली असा अंदाज आहे. खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.