Khed accident news Pudhari
पुणे

Khed accident news: आठ महाविद्यालयीन युवतींना मोटार व दुचाकीने उडवले; कुरकुंडी फाटा येथील अपघात

एकीचा मृत्यू; ७ जणींसह २ तरुण जखमी

पुढारी वृत्तसेवा

चाकण/राजगुरुनगर/भामा आसखेड: बसथांब्यावर एसटी बसची वाट पाहत थांबलेल्या महाविद्यालयीन युवतींना भरधाव मोटार आणि दुचाकीने उडवले. या भीषण धडकेत एकीचा मृत्यू झाला, तर सात युवती व दोन तरुण जखमी झाले. खेड तालुक्यातील पाईट-खेड रस्त्यावर कुरकुंडी फाटा येथे शुक्रवारी सकाळी ८ वाजता हा अपघात झाला.

अदिती नवनाथ राळे (वय १९, रा. कुरकुंडी, ता. खेड) असे या अपघातातील मृत युवतीचे नाव आहे. तर, वैष्णवी चंद्रकांत भोकसे (वय १९), संघनी नीलेश भोकसे (वय १९), वैष्णवी संतोष जाधव (वय २०), गायत्री विठ्ठल कोळेकर (वय १९), पूजा भगवान घोडके (वय १९), संजना सुधीर राळे (वय १९) आणि अनुष्का नवनाथ राळे (वय १७, सर्व रा. आसखेड, ता. खेड) या सात जणींसह दुचाकीवरील रोहन गारगोटे आणि ओंकार नेहरे (दोघेही रा. कडूस, ता. खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातातील मोटारचालक प्रमोद वसंत चाटे (वय ३२, रा. आळंदी, ता. खेड) हा घटनास्थळावरून फरार झाला. तर, मोटारमालक विकास हिरामण कराड (रा. आळंदी, ता. खेड) यास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी राजगुरुनगर येथे जाण्याकरिता या युवती पाईट-खेड रस्त्यावर कुरकुंडी फाटा बसथांब्यावर थांबल्या होत्या. तर, रस्त्याने मोटार (एम. एच. १२ व्ही. जी. १९७७) भरधाव येत होती. त्याच वेळी कुरकुंडी गावातून कडूसच्या दिशेने निघालेल्या दुचाकीवरील दोघांनी (एम. एच. १४ एम. डब्ल्यू. ३७९२) अचानक रस्त्यावर वळण घेतले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटारचालकाचे नियंत्रण सुटले.

ही दोन्ही वाहने धडकेनंतर थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवतींच्या घोळक्यात शिरली. यामध्ये अदिती राळे, वैष्णवी भोकसे, संघनी भोकसे, वैष्णवी जाधव, गायत्री कोळेकर, पूजा घोडके, संजना राळे आणि अनुष्का राळे यांच्यासह दुचाकीवरील रोहन गारगोटे आणि ओंकार नेहरे हे चिरडून जखमी झाले.

यापैकी अदितीचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर अन्य जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलिस पाटील वैशाली भोकसे यांनी माहिती दिली.

अपघातग्रस्त मोटारीत शिक्षक उमेदवाराचा बूथ प्रतिनिधी

कुरंकुडी येथे महाविद्यालयीन युवतीच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मोटारीत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका उमेदवाराचा बूथ प्रतिनिधी प्रवास करत होता. तो पाईट मतदान केंद्राकडे घाईघाईने जात असल्याने हा अपघात घडल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये होती. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

पोलिसांशी शाब्दिक चकमक

अपघाताचे ठिकाण हे उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाईट पोलिस चौकीच्या अंतर्गत येते. अपघातग्रस्त मोटार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा न करताच ताब्यात घेत पाईट पोलिस चौकीकडे नेल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला. पोलिसांच्या या कार्यवाहीवरून वाद निर्माण झाला.

दरम्यान, नातेवाइकांनी कोये हद्दीत मोटार अडवली. या वेळी पोलिस आणि नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर जादा कुमक बोलावून पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढली. तर दुपारी मृत अदितीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शांत, संयमी अदितीच्या मृत्यूने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, चांडोली ग्रामीण रुग्णालयात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी मृत अदितीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मृत अदितीचे चुलते अरुण सुदाम राळे हे उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. अदितीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, चुलते, चुलती, चुलतभाऊ असा परिवार आहे. अदितीची मोठी बहीण पोलिस सेवेत आहे. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

अपघाताची माहिती समजतात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांचा जमाव जमला होता. पळून गेलेल्या मोटारचालकाला शोधून आणल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृत अदितीच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. या वेळी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न सूर्यवंशी यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT