Dispute Pudhari
पुणे

Khed Illegal Mining: खेडमध्ये उत्खनन माफियांचा महसूल पथकावर हल्ला; हायवातून मुरूम ओतून रस्ता अडवला

तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या पथकाचा पाठलाग रोखण्याचा प्रयत्न; सुमारे २७०० ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे उघड, सात जणांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईला जाणाऱ्या खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे आणि महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर उत्खनन माफियांनी थेट हल्ला चढवला आहे. हायवा चालकाने गाडीतील मुरुम अचानक उलटून रस्ता अडवला, स्कूटीवरून आलेल्या दोघांनी गाडी रोखली तर जेसीबी चालक पळून गेले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार प्रशांत बेडसे व अधिकारी गुरुवारी (दि २२) सायंकाळी सुमारे ६.३० वाजता अवैध उत्खनन कारवाई पथक राजगुरुनगरहून पाबळ रस्त्याने निघाले होते. निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, ग्राममहसूल अधिकारी मनिषा जानराव, विजया पाटील, ब्रम्हानंद टाचणे तसेच महसूल सेवक दत्तात्रय चव्हाण, संतोष बो-हाडे, सुनिल गायकवाड हे बरोबर होते. निमगाव हद्दीत खेड सिटीजवळ एमएच-१२ वायक्यू ७९४६ हा हायवा मुरुम वाहून कनेरसरकडून खेडकडे येताना पथकाला दिसला.

पथकाने परत गाड्या वळवल्या. तेव्हा मागून आलेल्या स्कूटीवरील दोन अनोळखी इसमांनी पथकाच्या गाड्यांना रोखून “तुम्ही कोण?” असे विचारले. तहसीलदार बेडसे यांनी स्वतःची ओळख दिल्यानंतर ते बाजूला झाले. पथकाकडून हायवाचा पाठलाग सुरू झाला.रेटवडी येथील कॅनाल रस्त्यावर सव्वासात वाजता पथकाच्या पुढे चाललेल्या हायवा चालकाने अचानक मागील भाग वर करून अंदाजे ६ ब्रास मुरुम पथकाच्या गाड्यांवर आणि रस्त्यावर ओतला. लहान असल्याने रस्ता पूर्णपणे अडला. हायवा चालक अंधारात गाडी घेऊन पळाला.

त्यानंतर पथक एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेल्या गट नं. १४८६ येथे साय ७.३० वाजता पोहोचले. तिथे दोन जेसीबी मशीन उत्खनन करत होत्या. पथकाच्या गाड्या दिसताच चालक मशीन सुमारे २०० मीटर दूर उभी करून पळाले. या ठिकाणी अंदाजे २७०० ब्रास मुरुम उत्खनन आणि चोरी झाल्याचे आढळले. या ठिकाणी असलेल्या गणेश साहेबराव हजारे (रा. कनेरसर) यांनी मशीन आपल्या असल्याचे आणि हायवा सुयोग पांडुरंग पानसरे (रा. पाबळ, ता. शिरूर) यांचा असल्याचे सांगितले.

महसुल अधिकारी शिला बाळशीराम शेवाळे (४४, रा. लक्ष्मीनगर, राजगुरुनगर) यांच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. आरोपींमध्ये गणेश हजारे, सुयोग पानसरे तसेच स्कूटीवरील दोन अनोळखी, हायवा चालक आणि दोन जेसीबी चालकांचा समावेश आहे. खेड तालुक्यात अवैध उत्खननाचे जाळे किती मजबूत आहे, हे या घटनेने पुन्हा उघड झाले आहे. अधिकाऱ्यांच्या गाडीवर थेट मुरुम ओतणे आणि रस्ता अडवणे हे स्पष्टपणे दडपशाहीचे आणि आव्हानाचे कृत्य आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT