लोणी धामणी: गेली दोन महिने सुरू असलेल्या सततच्या पावसाने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन, वाटाणा, मका, उडीद, मूग, बाजरी आणि काही प्रमाणात बटाटा ही पिके पाण्याने सडली आहेत. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यंदा मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली आहे. चांगला पाऊस झाल्याने आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, मांदळेवाडी, वडगावपीर, शिरदाळे, पहाडदरा आदी परिसरात वेळेपूर्वीच पेरणी झाली. तर शिरदाळे येथे 10-20 टक्के क्षेत्रात बटाटा लागवड झाली. (Latest Pune News)
मात्र या भागात दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही. तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले. दुसरीकडे शेतात पाणी असल्याने अनेक शेतकर्यांना बटाट्याची लागवड करता आलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांचे बटाटे बियाणे, खते महिन्यापासून घरातच पडून आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे दोन्ही बाजूने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भागातील शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत, परंतु यंदा अतिप्रमाणात झालेल्या पावसाने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. हजारो रुपयांचे बियाणे मातीत पुरले असून त्याचा आता चिखल झाला आहे. तर शेतातील सर्व पिके पाण्यात सडल्याने वाया गेली आहेत. त्यामुळे या पिकांचा कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच सुप्रिया तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी, माजी सरपंच वंदना तांबे आणि जयश्री तांबे यांनी केली आहे.
यंदाचे पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. लवकर पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणीदेखील मृग नक्षत्राच्या आधी केली. परंतु अजूनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे योग्य सूर्यप्रकाश न मिळाल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. तसेच आजही बर्याच शेतकर्यांचे बटाटा बियाणे घरात पडून आहे. शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेऊन त्वरित पंचनामा करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी.-मयूर सरडे, माजी उपसरपंच