पुणे

पुणे : खराडी बनतंय ‘ग्लोबल स्टार्टअप हब’

अमृता चौगुले

पुणे : दिगंबर दराडे : कधी काळी पाण्यासाठी वणवण कराव्या लागणार्‍या खराडी गावची आता वेगळी ओळख तयार होत आहे. देशातीलच नव्हे, तर जगातील 'ग्लोबल स्टार्टअप हब' म्हणून खराडीची ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहराने मोठ्या आयटी उद्योगसमूहांना आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हिंजवडी, मगरपट्ट्यापाठोपाठ खराडीने जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक नवीन कंपन्या आपला विस्तार करण्यासाठी खराडीला पसंती देत आहेत.

या भागात आयटी कॉरिडॉर पसरलेले आहे. भारताच्या आयटी उद्योगापैकी 85 टक्के आयटी कंपन्यांची मुख्य कार्यालये पुण्यात आहेत. 'टेक स्टार्टअप'ची पहिली पसंती पुणे असून, जवळपास 4000 'टेक स्टार्टअप' कार्यरत आहेत. 'सेंटर फॉर अमेरिकन आन्त्रप्रेन्युअरशिप'ने खराडीला 'इमर्जिंग ग्लोबल स्टार्टअप हब' असे संबोधले आहे.

मुळा-मुठा नदीकाठावर वसलेले खराडी हे पुण्यातील सर्वांत चांगला भाग म्हणून विकसित होत आहे. जवळच असलेल्या कल्याणीनगरमध्ये अनेक कॉर्पोरेट उद्याने आहेत. याशिवाय खराडी हे कोरेगाव पार्क, बंडगार्डन रोड, सम—ाट अशोक रोड व ढोले पाटील रोड यासह सीबीडी भागात चांगले जोडलेले असल्याचे बांधकाम व्यावसायिक प्रशांत चोरडिया यांनी सांगितले.

कंपन्यांसाठी विविध सुविधा

''कोणत्याही भागाचा विकास करीत असताना आपण कोणत्या सुविधा देतो, हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. खराडी परिसरामध्ये जगातून विविध कंपन्या येत आहेत. या ठिकाणी कंपन्यांना लागणार्‍या सुविधा देण्याचे काम सुरू आहे. विमानतळावरून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या खराडी गावाने जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.''
                                                                                                                           – अतुल चोरडिया, डायरेक्टर, पंचशील

'इन्कोटेक पार्क्स'मुळे विकास

''माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र म्हणून पुण्याची नवी ओळख झपाट्याने सुरू आहे. 1990च्या दशकाच्या अखेरीस हिंजवडी येथे 'सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क'ची स्थापना झाली आणि वस्तुनिर्माणप्रधान असणार्‍या पुण्याच्या औद्योगिकविश्वाचे रूपांतर सेवाप्रधान औद्योगिक संकुलामध्ये होण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 'सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क'चे दोन टप्पे बघता बघता पूर्ण झाले. आता तिसर्‍या-चौथ्या फेजमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्या आपला कारभार थाटताना दिसतात. हिंजवडीच्या जोडीने तळवडे, मगरपट्टा, खराडी या ठिकाणीही 'इन्कोटेक पार्क्स' उभी राहिल्याने पुण्याचा केवळ औद्योगिकच नाही, तर टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण विकास झाला आहे.''
                                                                                                                    – मनीष माहेश्वरी, ग्रुप डायरेक्टर, मॅजेस्टिक

कंपन्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधांची गरज

''आंतरराष्ट्रीय शहर म्हणून पुण्याची ओळख होत असताना आपण चांगल्या प्रकारच्या शहरांमध्ये सुविधा देणे आवश्यक आहे. चांगल्या सुविधा दिल्या, तरच शहराचा विकास होणार आहे; अन्यथा केवळ एकाच भागाचा विकास होईल. आयटी कंपन्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा असणे फार आवश्यक आहे. कोरोनामुळे आयटी कंपन्यांचे जॉब स्ट्रक्चर बदलले आहे.''
                                                                                                                              – डॉ. दीपक शिकारपूर, आयटीतज्ज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT