येरवडा : खराडी बायपास ते मुंढवा रस्त्यावरील अहिल्यानगर परिसरात रविवारी (दि. 30) रात्री नऊच्या सुमारास वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून झालेल्या तेलगळतीमुळे बारा वाहने घसरून अपघाताची घटना घडली. खराडी अग्निशमन दलाच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील ट्रान्सफॉर्मरमधून तेलगळती होत असल्याचे वाहचालकाच्या लक्षात आले नसल्याने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत रस्त्यावर तेल सांडले. या मार्गावरून मार्गस्थ होणारी दुचाकी वाहने घसरून पडू लागली. सदरची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. तेल पडलेल्या संपूर्ण मार्गावर जवानांनी लाकडी भुसा व माती टाकून तासाभरात वाहतूक पूर्ववत केली.
बारा दुचाकी वाहनचालकांना किरकोळ मार लागला, तर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती येरवडा खराडी अग्निशामक केंद्राचे प्रभारी उप अग्निशमन अधिकारी नवनाथ वायकर यांनी दिली.
यावेळी दत्तात्रय सातव, चालक अक्षय राऊत, फायरमन चेतन डुमे, सुनील टेगळे, अक्षय वानखडे, शक्ती राठोड, कुणाल इथापे, सतीश बनसोडे यांनी काम पाहिले.