Injured Leopardess Rescue Pudhari
पुणे

Khamundi Injured Leopardess Rescue: उपासमारीमुळे जखमी बिबट मादी रेस्क्यू

वन्यप्राणी तज्ज्ञांच्या मदतीने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: अहिल्यानगर - कल्याण महामार्गालगत असलेल्या खामुंडी (ता. जुन्नर) येथील बदगी–बेलापूर रस्त्यालगत आज पहाटे जखमी अवस्थेत बिबट मादी आढळल्याची घटना घडली. सकाळी अंदाजे ६:४५ वाजण्याच्या सुमारास सुभाष भिमाजी बोडके यांच्या मालकीच्या गट क्रमांक ८० मधील शेतजमिनीत ही सुमारे दोन वर्षे वयाची बिबट मादी पडलेल्या अवस्थेत दिसून आली.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक, ओतूर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे, यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले तसेच आळे व नगदवाडी येथील रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. तज्ज्ञ डॉक्टरांनी बिबट मादीची पाहणी करून तिला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

दरम्यान माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रातील डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, या मादीला अनेक दिवस भक्ष मिळाले नाही व त्यामुळे तिला अशक्तपणा येऊन ती एका जागेवर निपचित पडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने नागरिकांना अफवा पसरवू नयेत तसेच वन्य प्राण्यांच्या हालचाली दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT