पुणे

पुणे : खामगाव मावळला अखेर पोहोचले खडकवासल्याचे पाणी

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या भीषण पाणीटंचाईग्रस्त खामगाव मावळ (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यानंतर अखेर बुधवारी (दि. 15) खडकवासला धरणाचे पाणी पोहोचले. गावाच्या टाकीत पाणी पोहोचताच जलपूजन करून महिलांनी पारंपरिक मावळी लोकगीतांच्या तालावर फुगड्या, झिम्मा खेळत आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने खडकवासला धरणावरून अडीच कोटी रुपये खर्चाची योजना खामगाव मावळ, मोगरवाडी व वाड्या-वस्त्यांसाठी राबविण्यात आली. खामगाव-मावळ वगळता सर्व ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला होता. खामगाव मावळ येथे पाणीच पोहोचले नाही, त्यामुळे फेब—ुवारीपासून खामगावकर भीषण पाणीटंचाईला तोंड देत होते.

याबाबत दै. 'पुढारी'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता पांडुरंग गवळी यांच्या देखरेखीखाली 4 मार्च रोजी गावातील जुन्या योजनेच्या टाकीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजता टाकीत धरणाचे पाणी पोहचले. तेथून घरोघरी नळाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

माधुरी वालगुडे, वंदना निंबाळकर, राणी लोहकरे, संगीता दुधाणे, सविता भोसले, मंदा भद्रिगे, सुवर्णा मिरकुटे आदी महिला व मुली आनंदोत्सवात सहभागी झाल्या होत्या. मावळा जवान संघटनेचे सिंहगड अध्यक्ष प्रशांत भोसले व युवकांनी जलवाहिनीचे मोजमाप घेण्यापासून बसविण्यापर्यंत मागील दहा दिवस धावपळ केली. त्याबद्दल महिलांनी प्रशांत भोसले, साहिल निंबाळकर, दीपक भदिर्गे, शुभम भोसले आदींचे औक्षण करून कौतुक केले.

SCROLL FOR NEXT