वेल्हे : दोन दिवसांपासून खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणक्षेत्रांत पावसाने विश्रांती घेतली. धरणसाठ्यातील आवक कमी झाली आहे. त्यामुळे जवळपास तीन महिन्यांनंतर खडकवासला धरणाच्या सांडव्याचे दरवाजे बंद करून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. (Latest
खडकवासला धरणसाखळीत बुधवारी (10) सायंकाळी 29.15 टीएमसी म्हणजे शंभर टक्के साठा झाला आहे. सध्या वरसगाव धरणातून 600, टेमघरमधून 300 क्युसेकने पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासलात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
सध्या धरणातून शेतीसाठी मुठा कालव्यात 501 क्युसेक व शहर व परिसराला पिण्यासाठी जवळपास 450 क्युसेक पाणी सोडले जात आहे. वरील धरणातून खडकवासलात पाण्याची भर पडत आहे. त्यामुळे खडकवासलातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याची तूट भरून धरण शंभर टक्के भरले आहे.
18 मेपासून खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात होते. हे पाणी मंगळवारी (दि. 9) रात्री 8 वाजता नदीत सोडणे बंद करण्यात आले आहे.- गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण