खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज गुरुवारी (7) धरणक्षेत्रात पावसाचे ढग दाटून आले. मात्र, तुरळक अपवाद वगळता पाऊस गायब झाला. खडकवासला धरण साखळीत सायंकाळी पाच वाजता 27.19 टीएमसी म्हणजे 93.28 टक्के पाणी साठा होता. पानशेत व वरसगाव धरणातून खडकवासला धरणात प्रत्येकी 600 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. पावसाअभावी पाण्याची आवक ठप्प झाल्याने पाणीसाठ्यात घट सुरू आहे. अलीकडच्या दहा वर्षांत प्रथमच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा कमी आहे. तसेच पावसाचे प्रमाणही जवळपास चाळीस टक्के कमी आहे.
1972 च्या दुष्काळासारखी परिस्थिती सध्या धरणक्षेत्रात निर्माण झाली आहे. त्या वेळी सुरुवातीला पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टपासून पाऊस गायब झाला होता. यंदा जोरदार पाऊस पडणार्या टेमघर, पानशेत व वरसगाव येथे गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के कमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी 1 जून ते 7 सप्टेंबरपर्यंत टेमघर येथे 3007, वरसगाव येथे 2174 , पानशेत येथे 2182 व खडकवासला येथे 530 मिलिमीटर पाऊस पडला होता, तर यंदा याच कालावधीत टेमघर येथे 2103, वरसगाव येथे 1347, पानशेत येथे 1316 तर खडकवासला येथे केवळ 333 मिलिमीटर पाऊस पडला.
गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत जवळपास दोन टीएमसी कमी पाणी आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये सर्व धरणे भरून वाहत होती. गतवर्षी खडकवासलातून उजनी धरणात 15 टीएमसीपेक्षा जादा पाणी सोडले होते. यंदा मात्र खडकवासलातून उजनीत केवळ अर्धा टीएमसीच पाणी सोडले आहे. गेल्या वर्षी 7 सप्टेंबर 2022 रोजी धरणसाखळीत 29.02 टीएमसी म्हणजे 99.61 टक्के साठा होता.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने पाण्याची आवक जवळपास बंद आहे. शेती व पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने खडकवासला साखळीतील पाण्याची पातळी कमी होत आहे.
हेही वाचा