खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत - वरसगाव धरणखोर्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. 20) सकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणार्या विसर्गात 39 हजार 138 क्युसेकपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, बुधवारपर्यंत खडकवासला धरणसाखळीत 28.66 टीएमसी म्हणजे 98.32 टक्के साठा झाला होता.
खडकवासला परिसरात पावसाचा जोर ओसरला असला तरी घाटमाथ्यावर मुसळधार सुरू आहे. टेमघर येथे मंगळवारी (दि. 19) सकाळी सहा ते बुधवारी सायंकाळी पाच या 35 तासांत विक्रमी 276 मिलिमीटर पाऊस पडला. तर याच कालावधीत पानशेत येथे 182, वरसगाव येथे 195 व खडकवासला येथे 88 मिलिमीटर पाऊस झाला आहे. (Latest Pune News)
या पावसामुळे मोसे, आंबी, मुठा नद्यांसह ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पानशेतमधून 10 हजार 112, तर वरसगावमधून 10 हजार 105 तर टेमघर धरणातून 3 हजार 122 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासलातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तरीही धरणाची पातळी 99.16 म्हणजे सुमारे शंभर टक्क्यावर आहे.
2 टीएमसी पाणी सोडले
खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळपासून बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुठा नदीपात्रात तब्बल 2 टीएमसी जादा पाणी सोडले आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत मुठा नदीत 14.81 टीएमसी पाणी सोडले आहे.
खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र पानशेत खोर्यातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वरील तिन्ही धरणांतून सोडलेल्या पाण्याची भर खडकवासलात पडत आहे. त्यामुळे खडकवासलातून जादा पाणी सोडले जात आहे. पानशेत खोर्यात दुपारपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. आता जोरदार पाऊस पडला नाही, तर खडकवासलाचा विसर्ग कमी करण्यात येणार आहे.- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, खडकवासला