Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एकीकडे पुणे पोलिस या प्रकरणात वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात व्यस्त असताना, दुसरीकडे न्यायालयाबाहेरही मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी मुख्य आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला तब्बल 10 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या वादाची सुरुवात वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान झाली. न्यायालयात सिया गोयलने, "माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून अॅडव्होकेट विपुल दुशिंग आहेत," असे सांगितले. या विधानानंतर प्रकरणाला वेगळेच वळण लागले.
अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी आरोप केला आहे की, साहिल गोयलने त्यांच्याविरोधात खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेला मोठा धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे त्यांनी साहिल गोयलला 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस पाठवली आहे.
या नोटिशीत केवळ नुकसानभरपाईची मागणी करण्यात आलेली नाही, तर साहिल गोयलने आपले सर्व आरोप तात्काळ मागे घ्यावेत, सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोप पुन्हा करणार नाही, असे लेखी आश्वासन द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. आता या नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतो, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी न्यायालयाने 3 जुलैपर्यंत वाढवली आहे.
पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, चेतन चौधरीची 'गेट अॅनालिसिस' (Gait Analysis) ही वैज्ञानिक चाचणी केली जाणार आहे. या चाचणीत त्याच्या चालण्याच्या पद्धतीची तुलना लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित व्यक्तीशी केली जाणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवालचा मृत्यू झाला त्या दिवशी लोहगड किल्ल्यावर एक व्यक्ती हुडी आणि मास्क घालून फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने किल्ल्यावर जाण्यासाठी तिकीटही घेतले नव्हते. चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख स्पष्ट होऊ शकली नव्हती.
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चौकशीदरम्यान घटनास्थळी उपस्थित असल्याचे मान्य केले असले, तरी न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पोलिस फॉरेन्सिक तपासावर भर देत आहेत.
गेट अॅनालिसिसमध्ये संशयिताच्या चालण्याची पद्धत, पावलांची लांबी, शरीराची ठेवण, हात-पायांच्या हालचाली यांचा सखोल अभ्यास करून त्याची तुलना सीसीटीव्हीतील व्यक्तीशी केली जाणार आहे.
याशिवाय लोहगड किल्ल्यावर गुन्हा नेमका कुठे घडला, घटनास्थळाचे पुन्हा री-क्रिएशन करणे आणि केतन अग्रवाल यांचा बेपत्ता पासपोर्ट शोधणे, ही तपासातील महत्त्वाची कामे अद्याप बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या तपासासाठीच आरोपींची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.