पुणे : गुन्ह्याचा कोणताही ‘क्लू’ पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी इतर तिऱ्हाईत व्यक्तीला विश्वासात न घेता केतन अगरवाल याच्या खुनाचा संपूर्ण कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. केतन अगरवाल खून प्रकरणाचा उलगडा करताना ग्रामीण पोलिसांनी पारंपरिक ‘पोलिसी खाक्या’चा अवलंब न करता मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी केली. आरोपींच्या वर्तनाचा अभ्यास, त्यांच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी हळूहळू बोलते झाले आणि नियोजनबद्ध हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आला.
दि. १८ जून रोजी केतन अगरवालचा लोहगडावर अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव सिया गोयलने केला होता. मात्र, सुरुवातीपासूनच केतनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यातच बाली येथे होणाऱ्या प्री-वेडिंग शूटपूर्वी केतनचा पासपोर्ट हरवल्याची बाब व लोहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ भर उन्हात हुडी परिधान करून, चेहरा झाकलेली संशयित व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाला गती दिली.
मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि दोघांच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. घटनेपूर्वी व घटनेनंतरच्या त्यांच्या संपर्कातून अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. सिया आणि चेतन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर दोघांची स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात आली.
लुल्लानगरमध्ये सियाला नेत सीन रिक्रिएशन
केतन अगरवालला लोहगडावरून ढकलण्यापूर्वीच आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी ३० मेपूर्वी आणि नंतर कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथील फकरी रस्ता-बकरी होळ परिसरात प्रत्यक्ष सराव केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानंतर संपूर्ण नियोजन करून १८ जून रोजी केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्यात आले. या पार्श्वभूमीवर दि. २ जुलैला (बुधवारी) पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला घटनास्थळांसह लुल्लानगर परिसरात नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन केले.