पुणे: सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. आता न्यायमूर्ती चांदीवाल यांनी देशमुख यांना क्लीन चिट दिली नसल्याचा खुलासा केला आहे. यावरून देशमुख निर्दोष नाहीत, हेच सिद्ध होते. त्यामुळे शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात देशमुख सोडून दुसरे कुणी वाटेकरी होते का, याची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपाध्ये बोलत होते. या वेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते.
उपाध्ये म्हणाले, सचिन वाझे यांनी शंभर कोटींच्या वसुलीचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा आयोग नेमला होता. त्या वेळीच आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे. देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर काल-परवापर्यंत म्हणत होते, की चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा.
या अहवालातून आपण आपले निर्दोषत्व सिद्ध करू, असे त्यांना वाटत होते. मात्र, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काल खुलासा केला, की त्यांनी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही. चांदीवाल यांनी स्पष्टीकरण दिल्याने वाझे प्रकरणाला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात देशमुख सोडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षातील आणखी दुसरे कोणी वाटेकरी होते का, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करत चांदीवाल आयोगाच्या या गौप्यस्पोटानंतर आता देशमुख माफी मागणार का? असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीवरून पोरखेळ सुरू केला आहे. ते निवडणूक आयोगापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत. त्यांना राजकारणाचे गांभीर्य नाही, हे यानिमित्ताने स्पष्ट होते. महायुती सरकारने केलेल्या विकासाच्या प्रकल्पाची यादी आम्ही देऊ शकतो. मात्र, महाविकास आघाडीकडे केलेली कामे नाहीत, सत्तेत आल्यावर काय कामे करणार, याचे नियोजन नाही. त्यामुळे ते मोदींवर टीका करत आहेत. प्रकल्पांना स्थगिती देऊन महाविकास आघाडीने महाराष्ट्राला खर्चात पाडण्याचे काम केले आहे, असेही उपाध्ये म्हणाले.