Kedgaon Electric Shock Death Pudhari
पुणे

Kedgaon Death: केडगावमध्ये विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात तुटलेल्या तारेला स्पर्श

केडगाव (दौंड) येथे शेतात पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणाचा आरोप करत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव येथे सोमवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा गंभीर आरोप मृत युवकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश गणेश जगताप (वय २४, रा. केडगाव) हा सोमवारी सकाळी आपल्या शेतात गेला असता तेथे पडून असलेल्या विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला. जोरदार विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जगताप यांच्या शेतामध्ये विद्युत तार तुटून पडली होती. ही बाब ग्रामस्थांसह जगताप कुटुंबीयांनी वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. संबंधित तार तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. केवळ निष्काळजीपणामुळे एका होतकरू तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यश जगताप हा कुटुंबातील कर्ता सदस्य असल्याने त्याच्या निधनाने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी किरण देशमुख यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर केडगाव परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतातील व गावातील धोकादायक अवस्थेतील विद्युत तारा व खांबांची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात आणखी जीवितहानी होऊ नये, यासाठी महावितरणने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT