पुणे

पिंपरी : ‘कयाकिंग’ला जलपर्णीचा विळखा; सरावासाठी खेळाडुंना गाठावे लागते कासारसाई

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात थेरगाव येथील केजुदेवी बंधारा या ठिकाणी पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटरमध्ये कयाकिंग आणि कनोइंग या खेळाचा सराव खेळाडू करतात. मात्र नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे खेळाडूंना सरावात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कासारसाई येथे खेळाडूंना सरावासाठी जावे लागते. केजूदेवी बंधारा परिसरात जलपर्णीचा विळखा पडल्याने कयाकिंग या खेळाच्यरा सरावासाठी खेळाडुंना लांबचा हेलपाटा मारावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख असली तरी खेळांमध्येही नावलौकिक मिळविणारे शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यासाठी थेरगाव येथील केजुदेवी बंधार्‍यामध्ये 2001 ला बोट क्लबची स्थापना झाली. 2005 मध्ये याच ठिकाणी पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटरची स्थापना करून, कयाकिंग आणि कनोइंग या खेळाला प्राधान्य दिले. येथ 2005 मध्ये पहिली राज्यस्तरीय स्पर्धादेखील पार पडली. स्पर्धेत सर्वाधिक पदक मिळवत शहरातील क्लब विजेता ठरला. परंतु यानंतर मात्र महापालिकेने कयाकिंग आणि कनोइंग या खेळाकडे दुर्लक्ष केले, अशी ओरड शहरातील खेळाडूंकडून होत आहे.

खेळाडूंच्या मागण्या
नदीपात्रातील जलपर्णी नियमितपणे काढण्यात यावी. तसेच पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
महापालिकेने कयाकिंग आणि कनोइंग खेळासाठी आवश्यक साहित्य साधने खेळाडूंना पुरविणे.
सरावा ठिकाणी खेळाडूंसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
खेळाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोचची नेमणूक करण्यात यावी. त्यांना महापालिकेने मानधन पुरविण्यासाठी सोय करावी.
खेळाडूंना महापालिकेमध्ये नौकरीसाठी प्रयत्न करणे.

खेळासाठी आमचा रात्रंदिवस सराव सुरु असतो. खेळामुळे देशाचे आणि शहराचे नावदेखील मोठे होते. मात्र महापालिकेचे या खेळाबाबत उदासीन धोरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळविले तरीही आम्हांला सरावासाठी योग्य सोय महापालिका करून देत नाही.
                                             – पंकज पाटील, खेळाडू, चिंचवडगाव.

नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे आम्हाला सरावासाठी कासारसाई येथे जावे लागत आहे. सरावानंतर आम्ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतो. मात्र ये-जा करण्यात बराच वेळ वाया जातो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आम्ही त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था
केली आहे.
                                                    -देवेंद्र सुर्वे, चिंचवड.

खेळाबाबत बर्‍याच वर्षापासून मोफत स्वरूपात मार्गदर्शनाचे काम सातत्याने करीत आलो आहे. मात्र महापालिकेची अद्यापपर्यंत काहीच मदत मिळाली नाही. सर्व मुले गरीब घरातील आहेत. सरावासाठी त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीच फी आकारली नाही. परंतु, महापालिकेने प्रशिक्षकपदी नेमूण मानधनाची व्यवस्था करावी.

                                             – स्वामी महात्मे, प्रशिक्षक, चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT