पुणे

कात्रजला गॅसवाहिनी फुटली; राजमाता भुयारी मार्गाजवळील घटना

अमृता चौगुले

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रज परिसरातील वंडर सिटी येथे महापालिकेच्या पंपिंग स्टेशनच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हे खोदकाम सुरू असताना राजमाता भुयारी मार्गजवळ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीची (एमएनजीएल) गॅसवाहिनी फुटली. यामुळे वाहिनीमधून दहा मिनिटे गॅसगळती झाली. त्यानंतर अग्निशमन दलाने वाहिनी बंद करून गॅसगळती थांबवली. तसेच 'एमएनजीएल'ने या वाहिनीतील गॅसपुरवठा थांबविल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

कात्रज पंपिंग स्टेशनपासून ही गॅसवाहिनी जांभुळवाडीकडे जाणारी असून, तिची क्षमता सुमारे चार बार प्रेशर आहे. कात्रज पंपिंग स्टेशनपासून वडगाव पंपिंग स्टेशनकडे जाणारी जलवाहिनी टाकण्यासाठी वंडर सिटी परिसरात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत आहे. महापालिकेने हे काम एल अँड टी कंपनीला दिले आहे. या खोदकामात अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच खोदकाम करताना कोणत्याही सूचना दिल्या जात नसून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात नसल्याने ही गॅसवाहिनी फुटल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

राजमाता भुयारी मार्गाजवळ खोदकाम करताना जी गॅसवाहिनी फुटली तिच्याखाली दुसरी मुख्य गॅसवाहिनी होती. तिचा प्रेशर 19 बार एवढा आहे. सुदैवाने त्या गॅसवाहिनीला धक्का न लागल्याने मोठा अनार्थ टळला. गॅसवाहिनी फुटल्याने कात्रज, आंबेगाव, जांभुळवाडी व धनकवडी परिसरातील सुमारे 35 ते 40 सोसायट्यांमधील सुमारे पाच हजार ग्राहकांचा गॅसपुरवठा 'एमएनजीएल'ने बंद केल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. मात्र, कंपनीने गॅसवाहिनीची दुरुस्ती करून तातडीने गॅसपुरवठा सुरळीत केला.

राजमाता भुयारी मार्गाशेजारी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना गॅसलाइन फुटली. यामुळे परिसरातील गॅसपुरवठा काही काळ बंद करण्यात आला. मात्र, तातडीने दुरुस्ती करून गॅसपुरवठा पूर्ववत करण्यात आला. महापालिकेच्या ठेकेदाराच्या दुर्लक्षाने गॅसवाहिन्या फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.

                                                     – ओंकार काळे, अभियंता, एमएनजीएल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT