Katraj Water Tanker Center Pudhari
पुणे

Katraj Water Tanker Center: दक्षिण पुण्याच्या पाणी प्रश्नाला मिळणार दिलासा'; कात्रज येथे टँकर भरणा केंद्राला मान्‍यता

नागरिकांनी व्यक्त केले समाधान

पुढारी वृत्तसेवा

कात्रज: कात्रज येथील राजीव गांधी पंपिंग स्टेशनलगत उड्डाणपुलाखाली महापालिकेचे स्वतंत्र पाणी टँकर भरणा केंद्र उभारण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. यामुळे दक्षिण पुण्याच्या पाणी प्रश्नाला दिलासा मिळणार आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील मर्यादित पाणीसाठ्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला असून, त्याची तीव्र झळ उपनगरांतील नागरिकांना बसत आहे.

या पार्श्वभूमीवर कात्रज येथे टँकर भरणा केंद्र उभारण्यास महापालिकेने मान्यता दिली असून, हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या प्रस्तावित जागेची पाहणी नगरसेवक व्यंकोजी खोपडे तसेच पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नितीन खुडे, कनिष्ठ अभियंता दीपक रोमन या अधिकाऱ्यांनी नुकतीच केली.

कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोलेवाडी या नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये पाणीप्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, या भागातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने टँकरवरच विसंबून राहावे लागते.

या गंभीर प्रश्नावर नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावर विशेष बाब म्हणून उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानुसार पाठपुरावा करत कात्रजमध्ये स्वतंत्र टँकर भरणा केंद्राची मागणी लावून धरली होती.

सध्या पद्मावतीमध्ये असलेल्या महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रातून दररोज सुमारे ६०० टँकर विविध भागात पाठवले जातात. यातील निम्म्याहून अधिक टँकर दक्षिण पुण्याकडे येतात. त्यामुळे पद्मावतीहून कात्रज, कोंढवा व समाविष्ट गावांपर्यंत टँकर पाठवताना वेळ, इंधन आणि मनुष्यबळ खर्ची पडत आहे.

कात्रज, कोंढवा आणि लगतच्या समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पद्मावती केंद्र दूर पडत असल्याने नागरिकांना वेळेत टँकर मिळत नाहीत. त्यामुळे महापालिकेचा वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

ही बाब लक्षात घेऊन कात्रज पंपिंग स्टेशनशेजारी उड्डाणपुलाखाली टँकर भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर नागरिकांना वेळेत महापालिकेचे टँकर उपलब्ध होतील, अशी माहिती नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी दिली.

कात्रज पंपिंग स्टेशनलगत टँकर भरणा केंद्रासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी आवश्यक पाण्याची टाकी उभारणे, जलवाहिनी टाकणे, पंप बसविणे आणि विद्युत कामे करण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
- नितीन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT