प्रसाद जगताप
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर रस्त्यावरील दिव्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अत्याधुनिक पध्दतीचे बसविण्यात आलेले पथदिवे बंद आहेत. आधीच हा रस्तां अरुंद असून वाहनांची रहदारी जास्त आहे. त्यात अनेक ठिकाणी दिवे बंद आहेत. काही ठिकाणी दिवे असून पुरेसा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. त्यामुळे या मार्गावर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरून अवजड वाहनांची प्रचंड वाहतूक असते. त्यामुळे या मार्गावर प्रत्येक ठिकाणी पथदिवे असणे आवश्यक आहे. परंतु, या ठिकाणी असलेले बहुतांश ठिकाणचे पथदिवे मिणमिणतात. कात्रजवरून कोंढव्याच्या दिशेने जाताना असलेल्या उड्डाण पूलावर दिवे बंद असल्याने अंधार असतो. तेथून पुढे माऊलीनगर येथून कोंढव्याकडे जाताना डाव्या बाजूला रस्त्यावर प्रकाश पडत नाही.
त्यासोबतच उंड्री, आबनावेनगर, मोहननगर, पिसोळी, हांडेवाडी भागांत बहुतांश ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. त्यामुळे डिव्हायडर दिसत नाहीत. ध्रुव ग्लोबल स्कूलसमोरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबावरील पथदिवे बंद आहेत. खडीमशिन चौकाच्या पुढे गेल्यावरसुध्दा अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. अवजड वाहने सुसाट धावतात. त्यामुळे पादचारी आणि दुचाकीचालकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कात्रज चौकापासून माउलीनगरपर्यंत प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, अप्पर इंदिरानगरकडून इस्कॉन मंदिर चौकातदेखील रस्त्याचे काम सुरू आहे. येथे अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. असे असले तरीही या भागात प्रखर प्रकाशाचे दिवे नाहीत.