पुणे: कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम भूसंपादन व वाहतूक नियोजनाअभावी रखडले होते. सध्या पिलरवरती गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी विविध विभागांच्या अधिकार्यांसह या कामाची नुकतीच पाहणी केली.
मुदतवाढीनुसार येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदाराला या वेळी दिली. टिळेकर म्हणाले की, या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक, कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. तसेच, 24/7 पाणीपुरवठा योजनेतील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना वाहतूक नियोजन व परवानगीबाबत सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, वाहतूकचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, सहायक आयुक्त अश्विनी राख, प्रभाकर कदम, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, तुषार कदम, विकास फाटे, राजू कदम, शिल्पा लंबे, उपअभियंता दिलीप पांडकर, शाखा अभियंता सलीम शेख, श्रीकांत वायदंडे, लक्ष्मण कादबाणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
भूसंपादनासाठी लक्षवेधी मांडणार
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी 280 कोटी निधी उपलब्ध असताना भूसंपादनासाठी दिरंगाई का ? असा सवाल उपस्थित करीत याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत लक्षवेधी मांडणार असल्याचे या वेळी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले. आवश्यक 32 जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोबदला देऊन ताब्यात घेण्यात येतील. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास एक ते दोन वर्षांत या रस्ता पूर्ण होईल, असेही ते या वेळी म्हणाले.
कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येत्या एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर 15 दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका.