Katraj Fire Brigade Rescue Pudhari
पुणे

Katraj Fire Brigade Rescue: कात्रजमध्ये धाडसी बचावकार्य; भिंतीत अडकलेल्या चिमुकल्याची सुटका

क्रिकेटचा चेंडू काढताना अडकला; अग्निशामक दलाने भिंत तोडून वाचवला ७ वर्षांचा मुलगा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एका इमारतीच्या टेरेसवर क्रिकेट खेळताना बॉल दोन भिंतींच्या अरुंद बोळात गेल्याने तो काढण्यासाठी गेलेला सात वर्षांचा मुलगा अडकून बसला होता. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी मंगळवारी धाडसी कारवाई करत भिंत तोडून त्याची सुखरूप सुटका केली.

कात्रज परिसरातील जांभूळवाडी रोडवरील गोविंद बेसिल सोसायटी परिसरात दोन भिंतींच्या अरुंद बोळात ही घटना घडली. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या टेरेसवर क्रिकेट खेळताना बॉल सोसायटीतील दोन इमारतींच्या मध्ये गेला. तो काढण्यासाठी सात वर्षांचा मुलगा बोळात उतरला; मात्र बोळ अरुंद असल्याने तो तिथे अडकून पडला. ही घटना समजताच क्रिकेट खेळणारे आणि सोसायटीतील इतर नागरिकांनी दोरी टाकून व इतर उपायांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बाहेर येऊ शकला नाही.

दुपारी 3 वाजून नऊ मिनिटांच्या सुमारास कात्रज अग्निशमन केंद्राला एका मुलगा दोन भिंतींच्या मधोमध अडकल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्या वेळी रणवीर चेतन चव्हाण (वय 7) हा मुलगा दोन भिंतींच्या मधोमध अडकलेला असल्याचे आढळले. परिसर अरुंद असल्याने अग्निशामक दलाला बचावकार्य करताना मोठी कसरत करावी लागली. जवानांनी हायड्रॉलिक बेकर व घनाच्या साहाय्याने भिंतीचा काही भाग तोडला. तसेच, बोल्ट कटरच्या मदतीने भिंतीतील लोखंडी सळ्या कापून मुलाला बाहेर काढण्यात आले.

या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे मुलाची सुखरूप सुटका करण्यात यश आले. या कारवाईत प्रभारी उप-अग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, फायरमन किरण पाटील, मयूर काटे, प्रशांत कुंभार तसेच चालक बंडू गोगावले यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT