पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) चारा, वैरण आणि वाहतूक खर्चात झालेल्या प्रचंड वाढीमुळे गाय आणि म्हैस दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर प्रत्येकी एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही खरेदी दरवाढ बुधवारपासून (दि. २१) लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना खरेदी दरवाढीमुळे थेट आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी दिली. मात्र, खरेदी दरवाढ झालेली असली तरी दुधाच्या विक्री दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे दूध खरेदीचे नवीन दर पुढीलप्रमाणे (वरकड खर्चासह संस्थांसाठी) आहेत. त्यामध्ये गाय दूध ( ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी) एक रुपया वाढीमुळे नवीन खरेदी दर प्रतिलिटर ४३ रुपये राहील, तर म्हैस दूध (६.० फॅट व ९.० एसएनएफसाठी) एक रुपया वाढीमुळे नवीन खरेदी दर प्रतिलिटर ५५.२० रुपये राहील.
दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी, दुग्ध व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाच्या दुधाचा पुरवठा करण्यासाठी दर्जेदार दूध पुरवठा महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संघ सदैव कटिबद्ध असल्याचे संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी म्हटले आहे.