पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाला 1 हजार 720 'ईव्हीएम' प्राप्त झाली असून, प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडून देण्यात आली. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दोन विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. त्यानुसार 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 26 फेब्रुवारी 2023 ला असून, मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 270 मतदान केंद्र, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 510 मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपीएटी मशीन असणार आहे. या दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण 780 मतदान केंद्र असून, एकूण 1 हजार 720 ईव्हीएम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहेत. या सर्व मशीनची पहिल्या टप्प्यात तांत्रिक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये मशीन व्यवस्थित चालू आहेत का याची तपासणी होते. उमेदवारी यादी अंतिम झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व राजकीय प्रतिनिधींसमवेत तपासणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
अशी आहे स्थिती
मतदारसंघ मतदार केंद्र
कसबा पेठ 2,75,428 270
चिंचवड 5,66,415 510