पुणे

पुणे : कसबा पोटनिवडणूक ; या मुद्द्यांवर निकाल अवलंबून

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कसबा पेठ मतदारसंघात चुरशीची लढत होत असल्याने पारडे कोणाच्या बाजूला झुकणार, हे रविवारी होणार्‍या मतदानात पेटीबंद होईल. महत्त्वाच्या काही स्थानिक मुद्द्यांवर निकाल अवलंबून राहण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरवड्यात पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या या मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून टाकले. पश्चिम बाजूच्या शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांमध्ये भाजपच्या उमेदवाराला किती आघाडी मिळणार आणि त्याविरोधात पूर्व भागातील कसबा, रविवार, नाना, गंज, घोरपडे आदी पेठांमध्ये आघाडीच्या बाजूला किती मतदार उभे ठाकणार, यांवर येथील निवडणूक निकालाचे भवितव्य अवलंबून राहील. लोहियानगर, मोमीनपुरा या मुख्यत्वे दलित, ओबीसी व मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या परिसरातील मतदानाची टक्केवारी किती वाढणार, याकडेही जाणकारांचे लक्ष राहील.

प्रचाराच्या वेळी विविध प्रकारचे दबाव टाकण्यात येत असल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. गुंडगिरी वाढल्याचे, पैसे वाटप केल्याचे आरोप केले जात होते. या दबावाचा परिणाम झाला की नाही, ते मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. पोलिसांची भूमिकाही रविवारी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या पेठांमध्ये पुण्याचा मुख्य गणेशोत्सव असतो. असंख्य गणेश मंडळे येथे आहेत. त्यांचे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोणती भूमिका बजावणार, याकडेही सर्वांचे लक्ष राहील. या मंडळांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय असतात. या मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एका अर्थाने मोहोळच आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भूमिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. जास्तीत जास्त कार्यकर्ते कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकणार आहेत, त्यावरही त्या-त्या भागातील राजकीय वातावरण बदलत जाणार आहे.

SCROLL FOR NEXT